२६ हजार नावे वगळली, २५ हजार समाविष्ट
By admin | Published: January 12, 2016 02:10 AM2016-01-12T02:10:49+5:302016-01-12T02:10:49+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली..
मतदार यादी पुनरीक्षण : जिल्ह्याची मतदारसंख्या झाली २० लाख
रूपेश उत्तरवार यवतमाळ
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात २६ हजार मतदारांची नावे वळण्यात आली तर २५ हजार मतदारांची यात नव्याने भर पडली आहे. आता जिल्ह्याची मतदार संख्या २० लाख झाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचे तत्काळ पुनरीक्षण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम पार पडला. यात २६ हजार मयतांसह दोन ठिकाणी असलेली नावे बाद करण्यात आली. जिल्ह्यात ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मतदारयादी पुनरीक्षण मोहीम राबविली गेली. या दरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. मतदारयादीत मयत, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, दोन ठिकाणी नावे असणाऱ्या व्यक्ती सर्वेक्षणकर्त्यांना आढळले. अशा २६ हजार ७८९ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. यासोबतच ज्या तरुण-तरुणींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. अशा २५ हजार ६२३ मतदारांची नावे राज्य निवडणूक आयोगाने समाविष्ट केली आहेत.