२६ हजार विद्यार्थ्यांनी सर केली बारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 09:51 PM2019-05-28T21:51:50+5:302019-05-28T21:55:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी घटली असून ८६.६९ टक्के निकाल लागला आहे. येथील जाजू महाविद्यालयाचा विद्यार्थी अभय बाफना याने ९४.७७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल ठरला आहे. तर जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आरोही अमीन ही ९३.५३ टक्के गुण घेऊन दुसऱ्यास्थानी आली.
फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १३८२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर दहा हजार ५०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. मात्र जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. त्याच वेळी विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी यावर्षीही १२ वीच्या निकालात बाजी मारली आहे.
वाणिज्य शाखेत जगजोत कौर हरविंदरसिंग नन्नारे प्रथम
जवाहरलाल दर्डा इंग्लीश मिडीयम स्कूल अॅन्ड जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी जगजोत कौर हरविंदरसिंग नन्नरे हिने ६०५ गुण मिळविले असून ती वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तिला ९३.०७ टक्के गुण मिळाले. पुढे आपल्याला सीए व्हायचे आहे, असे तिने सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मिनी थॉमस यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले.
जीवनयात्रा संपविणारी चेतना बारावीत यशस्वी
बाभूळगाव : निकालाच्या आदल्या दिवशी गळफास लाऊन आत्महत्या करणारी कोपरा(पुनर्वसन) येथील विद्यार्थिनी बारावीत यशस्वी झाली आहे. चेतना सदानंद शिंगाडे (१७) असे तिचे नाव आहे. ६५० पैकी ४०६ गुण घेत (६२.४६ टक्के) ती उत्तीर्ण झाली. चेतना हिने सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली होती. घरी कुणी नसल्याची संधी साधत तिने आपली जीवनयात्रा संपविली. तिने नानीबाई घारफळकर विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी निकाल लागणार असल्याने नापास होण्याच्या भीतीने तर तिने आत्महत्या केली नसावी असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आज चेतनाचा निकाल पाहण्यात आला. तिने ६२.४६ टक्के गुण घेत यश मिळविले आहे. विज्ञान शाखेतून तिने ही परीक्षा दिली होती.
जवाहरलाल दर्डा स्कूलची आरोही अमीन जिल्ह्यात दुसरी
बारावीच्या परीक्षेत यवतमाळ येथील आरोही अनिल अमीन ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून दुसºया स्थानावर आली आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. तिला ९३.५३ टक्के गुण मिळाले आहे. विशेष म्हणजे आरोहीने दहाव्या वर्गातही जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला होता. पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने ‘लोकमत’कडे बोलून दाखविले.