यवतमाळच्या २६ हजार विद्यार्थ्यांनी सर केली बारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:23 PM2019-05-28T15:23:21+5:302019-05-28T15:25:12+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी घटली असून ८६.६९ टक्के निकाल लागला आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १३८२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर दहा हजार ५०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. मात्र जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
तालुकानिहाय निकाल
यावर्षी जिल्ह्यात महागाव तालुक्याचा (९२.३०) सर्वाधिक निकाल लागला. तर वणी तालुक्याचा निकाल (७२.३३) सर्वात कमी आहे. उमरखेड ९१.३२, नेर ९१, आर्णी ९०.६८, पांढरकवडा ९०.३१, झरी ८८.५६, दिग्रस ८८.५२, कळंब ८७.६५, पुसद ८७.४३, यवतमाळ ८७.२३, दारव्हा ८७.२०, घाटंजी ८६.९१, बाभूळगाव ८२, मारेगाव ७६.८१ तर राळेगाव तालुक्याचा निकाल ७५.४४ टक्के लागला आहे.