नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक पेटल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:58 PM2018-05-17T17:58:24+5:302018-05-17T17:58:24+5:30
जनावरांनी भरलेला ट्रक सिमेंटच्या बॅरेकेटस्ला घासत गेला. परिणामी डिझेलची टाकी फुटून ट्रकला आग लागल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महामार्गावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलिसांना हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात जनावरांनी भरलेला ट्रक सिमेंटच्या बॅरेकेटस्ला घासत गेला. परिणामी डिझेलची टाकी फुटून ट्रकला आग लागल्याने २८ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद महामार्गावरील पाटणबोरीलगत आरटीओ चेकपोस्टवर घडली.
दुर्घटनाग्रस्त ट्रकच्या मागे आणखी एक जनावरांनी भरलेला ट्रक आदिलाबादकडे जात होता. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन त्यातील ४० जनावरांची सुटका केली. त्यानंतर त्या जनावरांना गावकऱ्यांच्या मदतीने वणी तालुक्यातील रासा येथील गोरक्षणात पाठविण्यात आले.
बुधवारी रात्री ११.५० वाजता एक ट्रक (क्रमांक एम.एच.२९-एच.ए.०७९१) मध्ये २८ बैल कोंबून सदर ट्रक पाटणबोरीवरून (ता. पांढरकवडा) भरधाव वेगाने आदिलाबादकडे जात होता. जाताना या ट्रकला आरटीओ चेकपोस्ट चुकवायचा होता. त्यामुळे त्याने आपल्या ताब्यातील ट्रक आरटीओच्या वे ब्रीजकडे न नेता सरळ मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. सरळ मार्गाने जाताना या रस्त्यावर सिमेंटचे बॅराकेटस् लावलेले आहेत. ट्रकचालकाने सदर बॅरेकेटस् प्लॅस्टिकचे असावे असे समजून त्यातून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅरेकेटस् सिमेंटचे असल्याने ट्रकच्या डिझेल टँकला ते घासल्या गेले. परिणामी ट्रकची डिझेल टँक फुटली. घासल्यामुळे ठिणग्यासुद्धा उडाल्या. या ठिणग्या डिझेलच्या संपर्कात आल्याने ट्रकने पेट घेतला. अवघ्या काही क्षणात आगीने संपूर्ण ट्रक आपल्या कवेत घेतला. या दुर्घटनेत ट्रक जळून खाक झाला, तर त्यातील २८ जनावरेदेखील होरपळून मृत्युमुखी पडलीत.
या ठिकाणी आग विझविण्याची कोणतीच सोय नसल्याने व जनावरे ट्रकमध्ये बांधून असल्याने तेथे उपस्थित आरटीओ अधिकारी, पोलीस अधिकारी, टोल नाक्यावरील कर्मचारी हतबल झाले होते. त्यांच्या डोळ्यापुढे बैलांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मृत बैलांना पाटणबोरीलगतच्या बंद सिमेंट फॅक्टरीच्या आवारात दफन करण्यात आले.
जळालेल्या ट्रकमध्ये २८ तर त्याच्या मागे असलेल्या दुसºया ट्रक (एम.पी.१९-एच.ए.०७४०) मध्ये ४० बैल बांधलेल्या अवस्थेत होते. चेकपोस्टजवळ ट्रक जळत असल्याचे पाहून मागे धावणाºया ट्रक चालकाने आपला ट्रक मागे वळविला. मात्र तोपर्यंत पाटणबोरी चौकीचे कर्मचारी तेथे पोहोचले. ट्रकला थांबविण्याचे प्रयत्न केले असता, त्यातील तिघांनी ट्रक सोडून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जळालेल्या ट्रकमध्ये चारजण होते. मात्र चौघांनी घटनास्थळावरून पलायन केले. आदिलाबाद व पांढरकवडाचे अग्नीशमन दल रात्री १ वाजताच्या सुमारास पोहोचले. जनावरांची तस्करी करणारे ट्रक नेमके कुठून आलेत, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.
या मार्गाने जनावरांची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. असे असताना पोलीस व परिवहन अधिकारी यापासून अनभिज्ञ कसे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू असून गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.