२९० कोटी गोत्यात; चार बँका चौकशीच्या फेऱ्यात : पोलिसांचा तपास संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:05 IST2025-01-15T17:01:58+5:302025-01-15T17:05:20+5:30

Yavatmal : अपहारातील मुख्य सूत्रधार मोकाटच; पोलिस म्हणतात, शोध सुरू

290 crores in the dump; Four banks under investigation: Police investigation not over | २९० कोटी गोत्यात; चार बँका चौकशीच्या फेऱ्यात : पोलिसांचा तपास संपेना

290 crores in the dump; Four banks under investigation: Police investigation not over

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा चार बँका गत काही महिन्यांत बुडाल्या. यात हजारो ठेवीदारांचे २९० कोटी रुपये अडकून पडले आहे. बाबाजी दाते महिला अर्बन, राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी आणि जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र अपहाराचे मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांना गवसले नाही. तपास सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जात आहे. त्यामुळे कष्टाने कमविलेली जमापूंजी परत कधी मिळणार असा सवाल ठेवीदार करीत आहे.


सहकार विभागाच्या अखत्यारीत बहुतांश बँका आणि पतसंस्था येतात. या बँकांवर सहकार विभागाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बँका व पतसंस्थांनी रातोरात गाशा गुंडाळून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्याचे समोर आले आहे. यामुळे या बँका व पतसंस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण नेमके कसे केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गत काही महिन्यात अपहाराच्या घटना पाहता ठेवीदारांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार विभागाकडून स्पेशल ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे. 


८५ जणांची जामीन रद्दसाठी न्यायालयात धाव
यवतमाळ येथील बाबाजी दाते १ महिला अर्बन बँकेत तब्बल २४२ कोटींचा अपहार झाला. या प्रकरणात तब्बल २०६ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापैकी केवळ १२ आरोपींना अटक झाली. यात न्यायालयाने ९ आरोपींना जामीन दिला. तीन आरोपी कारागृहात असून, ७६ आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. १२१ आरोपी अजूनही मोकळेच आहेत. त्यांना अटक करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. दरम्यान, जामीन प्राप्त झालेल्या ८५ जणांचा जामीन रद्द करावा, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाद मागितली जात आहे.


'एसआयटी' स्थापन होऊनही 'जनसंघर्ष'
दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि.च्या सात शाखेत सहा हजार २०० खातेदारांची ४४ कोटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, चार आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलिस पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलिस अधीक्षकांनी पांढरकवडा एसडीपीओ रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. मात्र महिना लोटला तरी खातेदारांना न्याय मिळालेला नाही. एका आरोपीचा पीसीआर तर दोघांचा एमसीआर १५ जानेवारीला संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.


राजस्थानी मल्टिस्टेटचा 'इओडब्ल्यू'कडे तपास 
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने ४४ ठेवीदारांना दोन कोटी ५१ लाख रुपयांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी दोन ते तीन महिन्यांपूर्वी बिटरगाव पोलिस ठाण्यात शाखा व्यवस्थापक अभिजित पुरमे, अध्यक्ष चंदुलाल बियाणी व इतर १२ सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणात एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. या गुन्ह्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे.


संत सेवालाल पतसंस्थेची चौकशी पुढे सरकेना 
पुसद येथील संत सेवालाल नागरी सहकारी पतसंस्थेत एक कोटी ५२ लाखांचा गैख्यवहार झाल्याचा आरोप १७१ ठेवीदारांनी केला आहे. लेखापरीक्षक यशवंत भोयर यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीतील लेखापरीक्षण केले. तत्कालीन संचालक मंडळाने तब्बल तीन कोटी एक लाखाचे कर्ज वाटप करून इतर बँकांमध्ये २५ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे दर्शविले. मात्र ते वाटप केलेले कर्ज व केलेली गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


 

Web Title: 290 crores in the dump; Four banks under investigation: Police investigation not over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.