दिग्रस येथून ४७ यात्रेकरू हज यात्रेला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 10:08 PM2019-08-01T22:08:29+5:302019-08-01T22:09:12+5:30
येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला. यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला.
यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे. त्यात येथील ४७ महिला-पुरुष यात्रेकरूंना सर्वधर्मीय बांधवांकडून निरोप देण्यात आला. जिल्ह्यातून यावर्षी तब्बल ३८० मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी रवाना झाले. जगभरातील शेकडो मुस्लीम बांधव सऊदीअरब येथे पवित्र हज यात्रेला जातात. इस्लामी देश असलेल्या इंडोनेशियानंतर तेथे सर्वाधिक हज-यात्रेकरू आपल्याच देशातील असतात. यंदा तब्बल दोन लाख भारतीय यात्रेसाठी पात्र ठरले. त्यात जिल्ह्यातील ३८० मुस्लीम बांधवांचा समावेश आहे. यात तालुक्यातून ४७ महिला व पुरुष पवित्र हजसाठी रवाना झाले. यात दिग्रस ब्लॉक जिनिंग प्रेसिंग संस्थेचे माजी अध्यक्ष अब्दुल हक सेठ, मौलाना काजी ग्यासोद्दीन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुहम्मद एजाज, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस. शेख, शब्बीर खान, डॉ.अशफाक, आरिफ गारवे, मुहम्मद मुख्तार, नासीर खान, मुहम्मद अय्युब, सैयद हबीब, मुहम्मद जावेद, मजीद डोसानी, युनूस बाळापुरे, अब्दुल करीम यांच्यासह कलगाव येथील १४ बांधव आणि महिलांचा समावेश आहे.
या सर्वांना माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, शहराध्यक्ष रवींद्र अरगडे, राजा चौहान यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लीम बांधवांनी निरोप दिला. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला.
देशाच्या चौफेर प्रगतीसाठी प्रार्थना करणार
यात्रेपूर्वी यवतमाळ, दिग्रस व पुसद या तीन ठिकाणी त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे जिल्हा प्रशिक्षक हाजी एजाजुद्दीन यांनी सर्व हज यात्रेकरूंना पाणीटंचाई व कास्तकारांवरील संकटांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी व देशाची चौफेर प्रगती, यश व अखंडतेसाठी तेथे विशेष प्रार्थना करण्याची विनंती केली.