कळंब येथे ३० लाखांचे शौचालय ‘सिल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:22 PM2018-08-10T22:22:13+5:302018-08-10T22:22:59+5:30
येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील पारवेकरनगरात १४ वित्त आयोगातून ३० लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. काम पूर्ण होऊनही वापरासाठी खुले न करता शौचालयाला ‘सिल’ ठोकण्याचा अजब प्रकार पुढे आला आहे.
पारवेकरनगर, कोलाम पोड वस्ती आदी भागातील लोकांना वैयक्तिक लाभाची शौचालय योजना देण्यात आली. ज्यांच्याकडे शौचालय बांधण्यासाठी जागा नाही, अशांसाठी नगरपंचायतीने या भागात सार्वजनिक शौचालय बांधाले. काम पूर्ण होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी झाला. परंतु लोकांसाठी खुले करण्यात आले नाही. या परिसरातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहे.
या शौचालयाच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर दोन धर्माच्या लोकांनी दावा ठोकला आहे. यासाठी निवेदनही देण्यात आले. परंतु प्रशासकीयस्तरावर कुठलाही तोडगा काढण्यात कुणीही पुढाकार घेतला नाही. नगरपंचायत ते कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या प्रशासनानेही केवळ बघ्याची भूमिका घेतली. दुसरीकडे नव्याने बांधलेल्या शौचालयाला ‘सील’ ठोकण्यात आले.
तसे पाहिले तर शौचालय आणि जागेचा वाद हे दोन वेगळे विषय आहे. जागेच्या वादात शौचालयाला सील लावले, हे कोणीही सांगायला तयार नाही. कारण शौचालयाचा वापर सर्वांसाठीच राहणार आहे. जागेचा वाद बाजूला ठेऊन शौचालयाचे ‘सिल’ काढावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
शौचालयाच्या बाजूला असलेल्या जागेचा वाद सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सील ठोकण्यात आले. यावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
- मनोज काळे, उपाध्यक्ष,
नगर पंचायत, कळंब