जिल्ह्यात आढळले ३० शाळाबाह्य मुले; शोधमोहिमेतून उघड, शाळेत केले दाखल
By अविनाश साबापुरे | Published: November 6, 2023 08:25 PM2023-11-06T20:25:05+5:302023-11-06T20:25:09+5:30
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला तरी अजूनही अनेक मुले शाळेपासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
यवतमाळ: मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला तरी अजूनही अनेक मुले शाळेपासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शिक्षण विभागाने राबविलेल्या शोधमोहिमेतून तब्बल ३० मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्याहून गंभीर म्हणजे, ५० मुले पालकांच्या रोजगारासाठी गाव सोडून परजिल्ह्यात गेले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये शिक्षण विभागासोबतच महिला व बालविकास, समाज कल्याण अधिकारी, कामगार आयुक्त, प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदी विभागांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. तर शिक्षक, मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका, विषय साधन व्यक्ती, दिव्यांग शिक्षण समन्वय आदी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोळाही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. यात तब्बल ३० मुले ही शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
या सर्व ३० मुलांना शिक्षण विभागाने नजीकच्या शाळेत दाखल करून घेतले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, सीईओ डाॅ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आढावा घेण्यात आला होता. त्यात जिल्हा शाळाबाह्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
५३ मुले यवतमाळच्या शाळेत दाखल
या मोहिमेदरम्यान आणखी एक वेगळी माहिती शिक्षण विभागाच्या हाती लागली. ५३ विद्यार्थी परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आपल्या पालकांसोबत यवतमाळ जिल्ह्यात आले आहेत. सर्वेक्षणानुसार, २१ मुले एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात आली आहेत. २० मुले वाशीम, ठाणे, अमरावती, नांदेड, जळगाव, पुणे, नागपूर व इतर जिल्ह्यातून आली आहेत. तर १२ मुले परराज्यातू स्थलांतरित झाली आहेत. गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी राज्यांतून ही मुले आल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. त्यांना शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला.
५० मुले घेऊन गेली शिक्षण हमी कार्ड
यावर्षी जिल्ह्यातून तब्बल ५० मुलांनी स्थलांतर केले आहे. पालकांनी रोजगारासाठी गाव सोडल्यामुळे मुलांनाही त्यांच्यासोबत जावे लागले. मात्र त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. १६ मुले एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित झाली आहेत. तर ३४ मुले इतर जिल्ह्यांमध्ये गेलेली आहेत. त्यांच्या नावासह संपूर्ण यादी शासनाला सादर करून वर्धा, चंद्रपूर, संभाजीनगर, पुणे, वाशिम, बुलडाणा, बीड, लातूर अशा जिल्ह्यांतील शाळांमध्ये शिक्षण हमी कार्डावर त्यांचे प्रवेश करून देण्यात आले आहेत.
कुठे आढळली शाळाबाह्य मुले?
आर्णी : ०२
दिग्रस : १५
घाटंजी : ०१
यवतमाळ : ०६
दारव्हा : ०३
मारेगाव : ०१
पुसद : ०२