३० टक्के बंगाली सुवर्ण कारागिरांना सक्तीची रजा

By Admin | Published: January 1, 2017 02:17 AM2017-01-01T02:17:13+5:302017-01-01T02:17:13+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले.

30 percent of Bengali gold jewelery compulsory leave | ३० टक्के बंगाली सुवर्ण कारागिरांना सक्तीची रजा

३० टक्के बंगाली सुवर्ण कारागिरांना सक्तीची रजा

googlenewsNext

नोटाबंदीची झळ : सराफा व्यवसायात ६० टक्के घट
यवतमाळ : नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले. कामेच येत नसल्याने यातील ३० टक्के बंगाली कारागिरांना त्यांच्या मूळगावी परतावे लागले. अद्यापही सराफा व्यवसाय सुरळीत झालेला नाही. त्यामुळे १५-२० दिवसांची सक्तीची सुट्टी भोगूनही त्यांना परतणे अवघड झाले आहे.
येथील सराफा बाजारात साधारण ३०० गठई कारागिरांची रोजीरोटी चालते. यात १०० पेक्षा अधिक कारागीर हे बंगाली आहेत. एखाद्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात किंवा मोठ्या कारागीराच्या हाताखाली ते काम करतात. ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर सोन खरेदीवर विपरित परिणाम झाला. सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतानाही खरेदी वाढलेली नाही. ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत धंदा खाली आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याची खरेदीच होत नसल्याने कारागिरांना कामे मिळेनाशी झाली. त्यामुळे यवतमाळातील जवळपास ४० कारागीर आपल्या मूळगावी निघून गेले आहेत. त्यांचे सहकारी संजय सामंता आणि सजल सामंता म्हणाले, हुगळी, मिदनापूर येथील कारागीर परत गेले आहेत. आमचाही जाण्याचा विचार आहे. मात्र मुलांची शाळा असल्यामुळे जाता येत नाही. हीच स्थिती स्थानिक कारागिरांचीही आहे. विनोद रूणवाल म्हणाले, पूर्वी एका दिवसात २-३ गोफ किंवा पोतचे काम करायचो. आता हप्त्यातून एखादा गोफ मिळाला तर मिळतो. गावाकडे गेलेले कारागीर परत येऊ का म्हणून रोज फोन करतात. पण त्यांना सध्या तरी बोलवणे शक्य नाही. त्यांचाच सहकारी नीलेश कुर्वे म्हणाला, नोटाबंदीनंतर कामेच बंद झाली. त्यामुळे मला १५ दिवसांची सुट्टी देण्यात आली. मी मालखेडला जाऊन आलो. पण आताही कामं नाही. पेट्रोलचा खर्चही निघत नाही. काहीच कमाई नसल्याने कारागिरांचे घरभाडेही थकल्याची माहिती श्री संत नरहरी सुवर्णकार कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज दहीवाल यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

तालुका पातळीवरील व्यवसाय ठप्पच
नाटाबंदीच्या परिणामांवर मात करीत यवतमाळातील व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. मात्र तालुका पातळीवरील सर्व व्यवहार अद्यापही ठप्पच आहेत. तालुका पातळीवरील सराफा व्यावसायिकांकडून यवतमाळातील कारागिरांकडे अनेक कामे येतात. यात बाभूळगाव, घाटंजी, पांढरकवडा, नेर, आर्णीतून मोठी आवक असते. परंतु, सध्या नोटाबंदीमुळे तालुक्यातून येणारी कामे पूर्णत: बंद आहेत.

जे व्यावसायिक कार्ड किंवा धनादेश स्वीकारत आहेत, त्यांचा धंदा कसाबसा सुरू आहे. पण इतरांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. अनेक लोक केवळ अंगठीवर लग्न आटोपत असल्याने कारागिरांना कामे मिळणे कठीण झाले आहे. बंगाली कारागीर त्यामुळेच गावाकडे परत गेले आहेत.
- सारंग भालेराव, अध्यक्ष सराफ व्यापारी असोसिएशन, यवतमाळ

 

Web Title: 30 percent of Bengali gold jewelery compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.