३0 हजार शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
By admin | Published: January 17, 2015 12:15 AM2015-01-17T00:15:40+5:302015-01-17T00:15:40+5:30
यावर्षी अत्यल्प पावसाने वणी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्याला धीर देण्यासाठी शासनाने मदत घोषित केली आहे.
वणी : यावर्षी अत्यल्प पावसाने वणी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्याला धीर देण्यासाठी शासनाने मदत घोषित केली आहे. या मदतीपैकी पहिल्या टप्प्यात तालुक्याला ९ कोटी २७ लाख रूप्ये प्राप्त झाले आहे. हे पैसे शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती. मात्र पावलसाने दगा दिल्याने बहुतांश पेरणी
उलटली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल २८ हजार ९३३ हेक्टरवर दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेरीस तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक अंदाजपत्रकच कोलमडले होते.
यावर्षी कपाशासह सोयाबिनच्या उताऱ्यात घट आली. त्यातच लावगड खर्च भरमसाठ झाला. फवारणी, निंदण आदी खर्चाने शेतकरी बेजार झाले.
कापूस वेचणीचे दरही वाढले. त्यातच दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने त्यांचे कंबरडेच मोडले. अखेरीस पीक हाती येण्याच्या वेळी पुन्हा परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उतारीत प्रचंड घट आली. एकरी उत्पन्न घटल्याने बळीराजावर दुष्काळाचे सावट पडले.
आता चहुबाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच ही मदत दिली ािणार आहे. त्यासाठी वणी तालुक्याला ९ कोटी २७ लाख रूपये प्राप्त झाल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले. या प्राप्त निधीतून आता शेतकऱ्यांना यादीनुसार मदत वितरीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागाने प्रत्येक मंडळनिहाय शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे. सुरूवातीला शिंदोला मंडळातील शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आली आहे. त्यात ३ हजार ४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना १ कोटी ८१ लाखांची मदत दिली जाणार आहे. शनिवारपासून या ३ हजार ४४ श्ोतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)