अक्षयतृतीयेसाठी ३० हजार क्विंटल आंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:11 PM2019-05-06T22:11:06+5:302019-05-06T22:12:49+5:30
अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.
यावर्षी दक्षिणात्य आंब्याची सर्वाधिक चलती आहे. या स्पर्धेत गावरान आंबा मागे पडला आहे. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतून येणारा अांबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये बैगनपल्ली, तोतापुरी, लालबाग, चरखुस आणि हापूस आंब्याचा समावेश आहे. एक हजार कॅरेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एका कॅरेटमध्ये २७ ते ३० किलो आंबे असतात. यानुसार ३० हजार क्विंटल आंब्यांची आवक बाजारात झाली आहे. त्याची विक्री करण्यासाठी २५० हातगाड्या आहेत. तर या तुलनेत गावरान आंबा मोजकाच बाजारात आला आहे. ६० ते १०० रूपये किलोपर्यंत आंब्याचे दर आहे. दक्षिणात्य आंब्याच्या स्पर्धेत गावरात आंबा असला तरी गावरान आंब्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र गावरान आंबा बाजारात उपलब्धच होत नाही.
अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे तरी कुठे ?
यवतमाळात कार्बाईडने पिकविलेली फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. रात्री हिरव्या कंच दिसणाऱ्या कैºया सकाळी पिवळ्या धम्म दिसतात. अर्थात त्या पिकलेला आंबा म्हणून ग्राहकांना थोपविल्या जातात. अशीच अवस्था बहुतांश फळांची आहे. परंतु त्यानंतरही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट मार्केटमध्ये धाड घालणे तर दूर साधी भेट दिल्याचेही ऐकिवात नाही. या अधिकाऱ्यांनी जणू फळविक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची खुली सूट दिल्याचे दिसते. नगरपरिषदेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करतो आहे.
कृत्रिम पिकविण्यावर बंदी
आंब्याला कृत्रिमरीत्या पिकविण्यावर बंदी आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकविण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागतो. यामुळे आंबा तयार होऊन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पूर्वी ५० ते ६० हजार क्विंटल आंब्याची विक्री होत होती.