मागील वर्षीच्या तुलनेत ३०० मि.मी. पाऊस कमी
By admin | Published: July 5, 2014 01:40 AM2014-07-05T01:40:14+5:302014-07-05T01:40:14+5:30
रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला.
पुसद : रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्यातच जमा आहे. मागील वर्षी जून महिन्यात पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी जुलै उजाडला तरी पूस धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल ३५० मि.मी. पाऊस कमी पडला आहे.
सध्या तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण पाणींटंचाई निर्माण झाली असून पाच गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात धो-धो कासळलेल्या पावसाने आता पावसाळ्यातील तिनही नक्षत्रे कोरडे गेल्याने तालुक्यात दुष्काळाची चिन्हे दिसू लागली आहेत. यावर्षी फेब्रुवारी ते १५ मे या कालावधीत कधी नव्हे तो प्रचंड पाऊस व गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीने रबी हंगाम वाया गेला. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या पावसाने पावसाळ्यात मात्र चांगलीच दडी मारली आहे. जिल्ह्यात सरासरी ८१३ मि.मी. एवढा पाऊस पावसाळ्यात पडतो. मागील वर्षी जून महिन्यातच पुसद तालुक्यातील पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, इंधन विहिरी व अन्य पेयजलांचे स्रोत तुडुंब भरले होते. यावर्षी मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. मागील वर्षी १४ जून रोजी ओव्हरफ्लो झालेले पूस धरणात यावर्षी केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुसद तालुक्यात काऱ्होळ, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, नारवाडी या पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यातच जून संपला तरी सुद्धा पाऊस न आल्याने अनेकांनी स्थलांतरण केले आहे. प्रशासनाने तलावामध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. मजुरांना रोजगार नाही. शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा सर्व परिणाम बाजारपेठेतील देवानघेवानीवर झाला आहे. बाजारपेठा ठप्प पडल्या आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे महागडे साहित्य कसे खरेदी करावे, याची काळजी शेतकरी, शेतमजूर यांना पडली आहे. बियाण्यांसाठी तजवीज करावी की मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा या विवंचनेत शेतकरी सध्या सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)