३२ लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:48+5:30
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायपासवरील वे ब्रिजजवळ पकडण्यात आला. ट्रकमध्ये दर्शनी भागाला तांदूळ ठेवला होता. परंतु आत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तांदळाच्या आडोशाने कर्नाटकातून यवतमाळ मार्गे वाशिमकडे जाणारा ३२ लाख रुपये किंमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू स्थानिक पोलिसांनी बायपासवर पकडला. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोघांना ताब्यात घेतले गेले.
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायपासवरील वे ब्रिजजवळ पकडण्यात आला. ट्रकमध्ये दर्शनी भागाला तांदूळ ठेवला होता. परंतु आत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला. हा माल वाशिम जिल्ह्याच्या कारंजामधील जाफर अली याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून जाफर अलीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. ट्रकचालक सनवर खान सलाउद्दीन खान (२४) व अब्दुल मुक्तार समी (२०) दोघेही रा.बिदर (कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर, एपीआय मिलन कोयल, प्रमोद पाचकवडे, विनोद चव्हाण, पीएसआय मंगेश भोयर, सचिन पवार, जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय पवन राठोड, योगेश गटलेवार, बंडू डांगे, हरीश राऊत, महेश पांडे, सुधीर पिदूरकर, मधुसूदन रणखांब यांनी केली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोपाल माहुरे, संदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
१५ कोटींच्या सुगंधित तंबाखूचे काय ?
भोसा रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामात लॉकडाऊन काळात १५ कोटी रुपयांच्या सुगंधित तंबाखूचा साठा करण्यात आला होता. एरिया सील केल्याने हा तंबाखू बाहेर काढणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने या संबंधी वृत्त प्रकाशित केले. या प्रकरणाची चौकशी नियंत्रण कक्षातील एका पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली. मात्र या चौकशीचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता नाही. आपल्याला दुसरीकडेच गुंतविले असे म्हणून हा अधिकारी हात वर करतो आहे. ही गोदामे शहरातील तंबाखू व्यापाऱ्याची आहेत. आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटी परिसरापर्यंत त्याची विक्री होत असल्याचे सांगितले जाते. इतर विविध चौकशांप्रमाणे १५ कोटींच्या सुगंधित तंबाखूची ही चौकशीही दडपली गेली असण्याची शक्यता आहे.