इसापूर धरणात ३२ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:50 PM2018-08-08T21:50:42+5:302018-08-08T21:51:12+5:30
तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
राजाभाऊ बेदरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले. जून महिन्याच्या मध्यापासून पावसाने दडी मारल्याने या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. नंतर जुलैमध्ये बºयापैकी पाऊस झाल्याने धरणात थोडा पाणीसाठा झाला. आता गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धरण भरण्यास विलंब होत आहे. या धरणाच्या कालव्यावरून पुसद, उमरखेड तालुक्यातील शेतीचे सिंचन केले जाते. मात्र अद्याप धरण पूर्णपणे भरले नसल्याने खरीप पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.
उमरखेड तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ३८४ मिमी पाऊस झाला. इसापूर धरण क्षेत्रात ५९५ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही धरण भरले नाही. हीच गत तालुक्यातील आठ लघु सिंचन प्रकल्पांची आहे. दराटी येथील तलाव ४३ टक्के, मरसूळ ४२, अंबोना ५२ टक्के भरला आहे. तरोडा आणि पोफाळी तलाव मात्र १०० टक्के भरले असून निंगनूर तलावातही ९६ टक्के पाणीसाठा आहे. पिरंजी तलाव ३६ टक्के भरला आहे. इसापूर व इतर लघु प्रकल्प पूर्णपणे भरले नसल्याने शेतकºयांसमोर खरिपाची चिंता आहे.
रबीला पाणी देणार
पुरेशा पाणीसाठ्याअभावी इसापूर धरणातून खरीप पिकाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. तथापि, रबी पिकांसाठी धरणातून चार ते पाचदा पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आहे. इसापूर प्रकल्प २ चे अभियंता आर.एस. माने यांनी याला दुजोरा दिला आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इसापूर धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा असल्याची माहिती माने यांनी दिली.