३२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यातून डच्चू
By admin | Published: April 3, 2017 12:18 AM2017-04-03T00:18:37+5:302017-04-03T00:18:37+5:30
नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला.
अडीच कोटींचा लाभ : पाच हजार शेतकरी पात्र
यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. मात्र केवळ पाच हजार शेतकरीच मदतीस पात्र ठरले. ३२ हजार शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आला.
राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने रबीचा पीक विमा जाहीर केला. यात जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी विमा मिळण्यास पात्र ठरले. त्यांना अडीच कोटींची मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणातून पिकांना वाचविण्यासाठी २०१५-२०१६ मध्ये ३८ हजार ५२ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. त्यांनी ५२ कोटींचे पीक संरक्षीत केले होते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. यामुळे पीक विमा उतरविणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता गहू, हरभरा व भुईमूगासाठी विम्याचा लाभ दिला जाणार आहे. गव्हाकरिता १० तालुके, हरभऱ्याकरिता केवळ दोन तालुके, तर भुईमूगासाठी एकाच तालुक्यातील शेतकरी पात्र ठरले.
गहू पिकाकरिता तीन हजार ३८९ शेतकऱ्यांना २९३९ हेक्टरकरिता एक कोटी ४९ लाख १९ हजार ३०४ रूपयांची मदत मिळणार आहे. यात यवतमाळ, केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, दिग्रस, नेर, आर्णी आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर)
भुईमूगाकरिता तीन शेतकरी पात्र
हरभऱ्याकरिता केळापूर आणि पुसद या दोनच तालुक्यातील दोन हजार ६९ शेतकऱ्यांना एक हजार ६७२ हेक्टरसाठी विमा दिला जाणार आहे. त्यांना ७५ लाख ४५ हजार ३९८ रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. भुईमूगाच्या विम्याकरिता केवळ तीन शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एक लाख २६ हजार ८४० रूपयांचा विमा दावा मिळणार आहे.