३२३ पांदण रस्त्यांचे अतिक्रमण काढले
By admin | Published: August 22, 2016 01:17 AM2016-08-22T01:17:09+5:302016-08-22T01:17:09+5:30
पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात
लोकसहभाग : ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी झाले खुले
यवतमाळ : पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात सामंजस्याची भूमिका घेतली तर हा वाद सहज मिटतो. लोकसहभागाचा वापर केला, तर पांदण रस्ते मोकळे करणे सहज शक्य होते. याच तंत्राचा वापर करीत जिल्ह्यातील ३२३ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. यामुळे ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहेत.
अतिक्रमण हटाव मोहीम सक्तीने राबविण्याऐवजी लोकसहभागातून राबविण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला. या मोहिमेत महसूल विभागाला पूर्णत: यश मिळाले आहे. लोकसहभागातून पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. यातून अनेक वर्षांचा वाद मिटला आहे.
पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र त्यावरूनच सतत वाद घडतात. आता पांदण रस्त्यामुळे अडकलेले शेतकरी स्वत:च्या शेतापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)
चारशे रस्ते वांद्यात
संपूर्ण वर्षभरात महसूल विभागाने ३२३ रस्त्याचे अतिक्रमण हटविले. यानंतरही ४०० रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. महसूल प्रशासनाने ४०० अतिक्रमित पांदण रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने उपाययोेजना करण्यासाठी लोकसहभाग घेतला जाणार आहे. यामुळे उर्वरित पायवाटांचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.