३२४३ प्रकरणात तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:31 PM2018-02-10T23:31:42+5:302018-02-10T23:31:58+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. या प्रकरणांचे एकूण तडजोडमूल्य सहा कोटी पाच लाख ५८ हजार ९१ रुपये इतके होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर विविध राष्ट्रीयकृत बँकांची वादपूर्व प्रकरणे होती.
आपसी तडजोडीने प्रकरणे मिटविण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष संदीपकुमार मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुरेश राजुरकर यांच्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यरत न्यायाधीशांनी प्रयत्न केले. वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकाºयांच्या बैठकी घेऊन त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व पटवून देण्यात आले होते.
रविवारी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये तीन हजार २४३ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदीपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनात ही लोकअदालत पार पडली. लोकअदालतीसाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्यासह विविध सिंचन प्रकल्प, सहकारी बँका, विमा कंपन्या, पोलीस विभाग, नगरपरिषद यांच्यासह जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक आदींचे सहकार्य लाभले.