भुकेपोटी चोरल्या ३३ सायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:20 PM2018-01-25T23:20:45+5:302018-01-25T23:20:57+5:30
आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाही. माझी सायकल अनामत ठेवा असे म्हणून तो सायकलच्या बदल्यात ५० ते १०० रुपये घ्यायचा. एक-दोन नव्हे तब्बल ३३ सायकली चोरून त्याने कुणाकडे तरी अनामत ठेवल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाही. माझी सायकल अनामत ठेवा असे म्हणून तो सायकलच्या बदल्यात ५० ते १०० रुपये घ्यायचा. एक-दोन नव्हे तब्बल ३३ सायकली चोरून त्याने कुणाकडे तरी अनामत ठेवल्या. पोलिसांनी या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्यावर धक्कादायक वास्तव पुढे आले. दारिद्र्यामुळे तो सायकली चोरुन आपल्या पोटाची भूक शमवायचा. त्याची ही कहाणी ऐकून पोलीसही दंग झाले.
यवतमाळच्या वडगाव रोड (अवधूतवाडी) पोलिसांना एक विधीसंघर्षग्रस्त बालक सायकल चोरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी त्या बालकाला ताब्यात घेतले. त्याची विश्वासाने चौकशी केली आणि त्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले. अभ्यासात कुशाग्रबुद्धीचा असलेल्या या बालकाची शाळा घरच्या दारिद्र्यामुळे अर्ध्यावरच सुटली. वडील केरकचरा गोळा करतात तर आई भटकंती करते. स्वत:चे घरही नाही. अशा परिस्थितीमुळे त्या बालकाला स्वत:च्या पोटाची खडगी भरावी लागत होती. यातूनच त्याने सायकल चोरण्यास सुरुवात केली.
चोरलेली सायकल विकण्याऐवजी तो कुणाकडे तरी सायकल अनामत ठेवायचा. ही सायकल अनामत ठेवताना तो विविध बहाणे करायचा. आई आजारी असल्याचे सांगून संबंधितांकडून ५० ते २०० रुपये घ्यायचा. पैसे आले की मी सायकल घेऊन जातो, असेही काकूळतिला येऊन सांगायचा. त्यामुळे समोरचा व्यक्तीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. त्याला मागितलेली रक्कम हातावर ठेवायचा. हे पैसे मिळाले की, तो थेट कुण्यातरी हॉटेलात जाऊन पोटाची खडगी भरायचा. गेल्या महिनाभरात त्याने तब्बल ३३ सायकली अशा पद्धतीने चोरुन अल्प किंमतीत गहाण ठेवल्या. जेवणाची सोय करणे एवढाच त्याचा चोरी मागचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने आपण चोरलेल्या प्रत्येक सायकलीची माहिती देत त्या सायकली कुठे-कुठे दिल्या हेही सांगितले. पोलिसांनी त्या ३३ सायकली जप्त केल्या. या सायकलींची किंमत एक लाख ८० हजार रुपयांच्या घरात आहे. ही कारवाई ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात नंदकुमार आयरे, सुगत पुंडगे व शोध पथकाने केली. त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले.