33 हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 05:00 AM2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:02+5:30
‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सध्या अत्र-तत्र-सर्वत्र कोरोनाने भयकंप उडविला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३९ हजार लोकांना या विषाणूने ‘बाटविले’ हे खरेच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त लोकांनी कोरोनालाच हरविले, हेही दिलासादायक वास्तव आहे. संशयास्पद वाटलेल्या तब्बल सव्वातीन लाख लोकांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यातील तीन लाख नागरिकांना कोरोनाचा स्पर्शही झाला नसल्याचे अहवालात सिद्ध झाले. याचाच अर्थ, कोरोना जवळपास येऊनही तीन लाख लोकांनी त्याला यशस्वीपणे हुलकावणी दिली; तर ज्या ३९ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यातील तब्बल ३३ हजार लोकांनी अवघ्या आठवडाभरात कोरोनावर मात केली. आरोग्य यंत्रणेची रात्रंदिवस धडपड अन् रुग्णांची स्वत:ची इच्छाशक्ती हेच कोरोनावर पहिले औषध ठरले.
‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली. धंदे बुडाले, रोजगार गेले, व्यापार थांबला, कोरोनाच्या आजारापेक्षाही मानसिक आजारांनी अनेकांना पछाडले. रोज येणारे रुग्णवाढीचे आकडे लोकांना घाबरवून सोडत आहेत. पण त्यासोबतच रोज कोरोनामुक्त होणाऱ्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
एकदा स्वत:लाच विचारून बघा. आपल्याला यापूर्वी कधीच ताप आला नव्हता? खोकला झाला नव्हता? झालाच होता. आपण अनेकदा रुग्णालयात राहून आलो. बरे झालो. मग कोरोना आला म्हणून एवढे हतबल वाटून घेण्याचे कारण नाही. आपल्या एखाद्या मित्राला साधा खोकला आला म्हणून मनात शंकेची पाल चुकचुकू द्यायची नाही. कोरोनाला हरविण्याचे साधे नियम आहेत. तेही विनापैशाचे. गर्दी करायची नाही, एकमेकांपासून थोडे अंतर राखायचे, वारंवार हात धुवायचे, तोंडावर मास्क लावायचा, जरा शंका वाटली, तर तपासणी करून घ्यायची... बस्स!
२७ लाख ७५ हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३९ हजार नागरिकांना कोरोना झाला. त्यातील ३३ हजार ३३४ लोक ठणठणीत बरेही झाले. त्यामुळे कोरोनाला घाबरून रोजचे जगणे अवरुद्ध करून घेण्यात काहीच हशील नाही. उलट, शासनाने घालून दिलेले नियम पाळून उरल्यासुरल्या विषाणूलाही पिटाळून लावा. जबाबदार बना, गर्दी टाळा, मास्क लावा आणि युद्ध जिंका.
ज्यावेळी सोयी नव्हत्या तेव्हा जिंकलो, तर आता का नाही?
यवतमाळात ७०-८० वर्षांपूर्वी प्लेग आला होता. तेव्हा आजच्याएवढी आरोग्य यंत्रणा अद्ययावत नव्हती. तरही प्लेगच्या महामारीतून माणसे वाचली. वाचविली गेली. आता एकविसाव्या शतकात कोरोना आलेला असताना वैद्यकीय शास्त्रही पुढारलेले आहे. कोरोनावर औषध मिळाले नसले, तरी केवळ सात आठ महिन्यांतच लस शोधली गेली. काही साधनांचा तुटवडा असला, तरी रुग्ण कसा वाचवायचा, हे डाॅक्टरांना माहिती आहे. जुन्या काळात प्लेग संपवता आला, तर आता आधुनिक काळात कोरोनालाही संपवताच येईल. कोणीही अवसान गाळून बसण्याची अजिबात गरज नाही.