नोकरीचे आमिष दाखवून ३४ लाखांना गंडविले, पाच जणांना फटका
By सुरेंद्र राऊत | Published: March 26, 2023 07:06 PM2023-03-26T19:06:35+5:302023-03-26T19:06:59+5:30
अमरावती, वाशिम जिल्ह्यातील आरोपी
यवतमाळ : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून रोख रक्कम वसूल केली. तब्बल ३४ लाखाने गंडा घातला. २०१६ पासून नोकरी दिली जाईल अशी आशा ते पाच बेरोजगार युवकांना दाखवत होते. बनावट सही, शिक्क्याचे नियुक्ती आदेशही तयार करून दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या युवकांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील पाच ठकबाजांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विलास गोवर्धन जाधव, सचिन भाऊराव शिरसाठ दोघेही रा. मोगरा ता.जि. अमरावती, मोहन जाधव रा. अमरावती, संतोष चव्हाण रा. मंगरूळपिर जि. वाशिम, आकाश रघुनाथ पवार रा. दत्तापूर ता. घाटंजी जि. यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या ठकबाजांची नावे आहेत. पंकज मनोज अतकर रा. जामनकरनगर, यवतमाळ याचा परिचय सचिन नंदू पवार व विशाल मोतीलाल चव्हाण या दोघांसोबत झाला. त्यांच्या माध्यमातून आरोपी विलास जाधव याच्याशी संपर्क आला. त्यावेळी वरील पाचही आरोपींनी बेरोजगार युवकांना विश्वासात घेवून सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दिले.
यासाठी पैसे लागतील असेही त्यांनी सांगितले. यात पंकज अतकर याच्याकडून आठ लाख रुपये, सचिन पवार याच्याकडून आठ लाख, विशाल चव्हाण याच्याकडून चार लाख, राकेश महाजन याच्याकडून पाच लाख ५० हजार, संतोष चव्हाण याच्याकडून आठ लाख ५० हजार अशी ३४ लाख रुपयाची रक्कम वसूल केली. ठगांनी कुणाला बँक ऑफ इंडियामध्ये लिपिकपदावर तर कुणाला स्काऊट गाईड विभागात नोकरी लावण्याचे आमिष दिले. इतकेच नव्हेतर नियुक्तीपूर्वीच्या ट्रेनिंगचा शासकीय सही, शिक्क्याचा आदेश देवून विविध शहरात ट्रेनिंगसाठी पाठविले. २०१७ मध्ये सर्व पाचही जण संबंधित शहरामध्ये रुजू होण्यासाठी गेले असता तेथे त्यांना त्यांचे नियुक्तीपत्र खोटे असल्याचे आढळून आले.
आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बेरोजगारांनी तात्काळ ठकबाजांची फोनवर संपर्क करून पैशाची मागणी केली. त्यापैकी सचिन पवार व विशाल चव्हाण या दोघांना आरोपींनी काही रक्कम परत केली. मात्र त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर पैसे मिळणार नाही, आपण ठगल्या गेलो हे लक्षात आल्यावर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी शासकीय शिक्क्यांचा खोटा वापर, बनावट कागदपत्र तयार करणे व त्याआधारे आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पैशासाठी कुणी घर, कुणी प्लाॅट विकले
शासकीय नोकरी मिळणार या आशेने ऐपत नसतानाही काहींनी राहते घर, शेती, प्लाॅट विक्री करून रक्कम उभी केली. आता नोकरीही गेली व वडिलोपार्जीत असलेली मालमत्ताही गमवावी लागली. नोकरीच्या आशेत संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आले आहे.