३४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:41 PM2018-02-20T23:41:24+5:302018-02-20T23:41:53+5:30
विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. २१ फेब्रुवारीला पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असून विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागही सज्ज झाला आहे.
उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यात बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदाही कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पुढाकरात तयारी पूर्ण झाली असून १०४ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या केंद्रांवर यंदा एकंदर ३४ हजार ११९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३१ हजार ८०६ इतके नियमित परीक्षार्थी असून २ हजार ३१३ विद्यार्थी ‘रिपीटर’ म्हणून परीक्षेला बसणार आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी यंदा प्रत्येक केंद्रावर बैठे पथक देण्यात येणार आहे. या पथकात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच सहा भरारी पथके संपूर्ण जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहेत. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २ निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १ आणि डायट प्राचार्यांच्या नेतृत्वात १ अशी सहा भरारी पथके राहणार आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून पथकातील अधिकारी आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्राचे मोबाईलद्वारे शूटिंग करणार आहेत.
तालुकानिहाय परीक्षा केंद्र
जिल्ह्यात एकंदर १०४ परीक्षा केंद्र आहेत. त्यात यवतमाळ तालुक्यात १५, नेर ४, दारव्हा ७, दिग्रस ५, आर्णी ७, पुसद १२, उमरखेड ७, महागाव ८, बाभूळगाव ५, कळंब ५, राळेगाव ४, मारेगाव २, पांढरकवडा ८, झरी ३, वणी ७, तर घाटंजी तालुक्यात ५ केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च अशी महिनाभर परीक्षा चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत इंग्रजीचा पेपर आहे. परीक्षार्थ्यांनी अर्धा तास आधीच केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.