रबीसाठी अनुदानावर मिळणार 35 हजार क्विंटल गहू, हरभरा बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 09:40 PM2022-10-30T21:40:48+5:302022-10-30T21:41:23+5:30
यावर्षीच्या रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने तयार केले आहे. यातील निम्म्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याचे नियोजन महाबीज कंपनीने तयार केले आहे. त्याकरिता ३२ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील आणि दहा वर्षांच्या वरील बियाणाचा यामध्ये समावेश आहे. ७० रुपये किलोच्या बियाणाला किलोमागे २० ते २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरीप हंगाम हातामधून गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण मदार रब्बी पिकावर अवलंबून राहणार आहे. या हंगामाकरिता शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतूद नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून महाबीज कंपनी पुढे सरसावली आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना अनुदानावर ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने तयार केले आहे. यातील निम्म्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याचे नियोजन महाबीज कंपनीने तयार केले आहे. त्याकरिता ३२ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील आणि दहा वर्षांच्या वरील बियाणाचा यामध्ये समावेश आहे.
७० रुपये किलोच्या बियाणाला किलोमागे २० ते २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला एक किंवा दोन बॅग दिल्या जाणार आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांना महाबीज कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडे संपर्क साधावा लागणार आहे. जिल्ह्यातील ६६३ विक्रेत्यांकडे कंपनीने हे बियाणे उपलब्ध करून दिलेेे आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरिपाची लागवड करताना मोठा दिलासा मिळणार आहे.
९० ते १०० दिवसात हातात पीक येणाऱ्या वाणावर शेतकऱ्यांनी आपले लक्ष केेेेंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बियाण्याची गुणवत्ता असावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दीड हजार क्विंटल गव्हाचे बियाणे
- यावर्षीच्या रब्बी हंगामात महाबीज कंपनी शेतकऱ्यांना गव्हाचे दीड हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. एका शेतकऱ्याला पेरणीकरिता एक बॅग दिली जाणार आहे. किलोमागे १५ रुपयाचे अनुदान कंपनी देणार आहे.
अनुदानित बियाणासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधावा लागणार आहे. याशिवाय कृषी विभागातून परमिट मिळविले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. पुरेसे बियाणे बाजारात आहे.
- प्रशांत देशमुख, विपणन विभागप्रमुख
परमिट अथवा सातबारा लागेल
- अनुदानित बियाणाकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी नसली तरी ऑफलाइन नोंदणीने बियाणे देण्याचा प्रयत्न होणार आहे. यासाठी कृषी विभागाचे परमिट अथवा ऑनलाइन सातबारा बंधनकारक राहणार आहे. बियाणे वितरणासाठी सोप्या पद्धतीचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांना सहज बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.