पावसाची उसंत; मात्र यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३७ गावांना पुराचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 10:37 AM2022-07-20T10:37:53+5:302022-07-20T10:43:10+5:30
वणी तालुक्यातील तीन गावांची स्थिती गंभीर, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे धोका
यवतमाळ/ चंद्रपूर : आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी यवतमाळ जिल्ह्यातील ११ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६ अशी ३७ गावे पुराने वेढली आहेत. यवतमाळच्या वणी तालुक्यातील तीन गावांची स्थिती गंभीर आहे. या भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी वर्धा येथून राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक वणीकडे निघाले आहे.
सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. त्यातच बेंबळा प्रकल्पासह जिल्ह्यातील आठ प्रकल्पांतून पाणी सोडल्याने बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब आणि वणी या पाच तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणचा पूर ओसरला असला, तरी मंगळवारी वणीतील भुरकी, रांगना आणि सेलू खुर्द या गावांत पूरस्थिती गंभीर असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य करीत आहे.
२,२४७ जणांचे स्थलांतर
मंगळवारी पुरात अडकलेल्या जिल्ह्यातील तब्बल ५६२ कुटुंबांतील २,२४७ जणांचे स्थलांतर करण्यात आले. मुसळधार पावसामुळे नेर, कळंब आणि घाटंजी या तीन तालुक्यांतील तब्बल १,७६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पावसाने जिल्ह्यात काहीशी उघडीप दिली. सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी २२.४ मिमी पाऊस झाला असून, यवतमाळ तालुक्यात २८.८, बाभूळगाव ५१.२, कळंब ४३.६, दारव्हा ३३, दिग्रस २०.८, आर्णी २०.७, नेर ५१.२, पुसद १४.४, उमरखेड ९.३, महागाव १८.३, वणी २.४, मारेगाव ११.५, झरी जामणी २.९, केळापूर १५.५, घाटंजी २०.८, तर राळेगाव तालुक्यात २९.८ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेकडो एकर शेती अजूनही पाण्याखाली आहे. अनेक गावांतील व शेतावरील विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. देवळीच्या यशोदा नदीला आलेल्या पुरात दिघी (बोपापूर) नजीकच्या अजनावती शिवारात शेतातील गोठ्यासह दोन बैल वाहून गेले.
बल्लारपूर-राजुरा मार्ग ठप्प
चार दिवसांपूर्वी सुरू झालेला बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बंद झाला. अपर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने डॉ. आंबेडकर वाॅर्ड, एकता नगर वाॅर्ड क्र. ३ मध्ये हाहाकार उडाला. पोंभुर्णा तालुक्यातील जूनगावचा संपर्क तुटला. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. वरोरा तालुक्यातील सोईट, कोहोपरा, करंजी, आष्टी, बामरडा, दिंदोळा, आमडी, नीलजई येथील काही पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे घराची भिंत कोसळल्याने तीन बकऱ्या ठार झाल्या. चंद्रपुरातील इरई धरणाचे सात दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदीला पुन्हा पूर आला. नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
माजरी कॉलरीत हाहाकार
भद्रावती तालुक्यातील पळसगाव, थोराना, मणगाव, पाटाळा, कोंढा , कोची, पिपरी, घोनाड, चारगाव, माजरी कॉलरीत वर्धा व सिरना नदीचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. वेकोली वसाहत वस्तीतील सहा प्रभागांत सात ते आठ फुटांपर्यंत घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धोक्याची पातळी ओलांडली आहे.
२०० लोकांना बोटीने बाहेर काढले
पळसगाव येथील २०० लोकांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या गावातील कुटुंबांना एकतानगर चारगाव वसाहत व माजरी येथील नेहरू क्लब, महावीर शाळा कुसना येथे हलविण्यात आले. भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार शंकर भांदककर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पाऊस राहील; पण जोर ओसरेल
साेमवारी रात्री जाेराच्या हजेरीनंतर मंगळवारी मात्र दिवसभर पावसाने थाेडी उघडीप दिली. संपूर्ण विदर्भात दिवसभर अत्यल्प पावसाची नाेंद झाली. हवामान विभागाने पुढचे दाेन-तीन दिवस रिमझिम राहील; पण जाेर मंदावेल, असा दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र गडचिराेली आणि गाेंदिया जिल्ह्यात काही भागात मध्यम ते जाेरदार पाऊस हाेण्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
७ जुलैपासून आतापर्यंत विदर्भासह महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पूर्व विदर्भातील बहुतेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. गडचिराेली जिल्ह्यातील बहुतेक गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली. सिराेंचा, अहेरी, मुलचेरा, कुरखेडा या भागात दरराेज सरासरी १०० मि.मी.च्या वर पाऊस झाला. प्रशासनातर्फे हजाराे लाेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. १०० च्या वर जनावरे दगावली आहेत. अनेक गावांचा मुख्य शहराशी संपर्क अद्यापही तुटलेला आहे. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांना मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसला. चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांतही पुराची स्थिती निर्माण झाली. विदर्भात आतापर्यंत ५७०.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली जी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा ५८ टक्के अधिक आहे.