वणीत ३७० किलो गोमांस जप्त, सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 03:34 PM2022-01-24T15:34:19+5:302022-01-24T16:47:39+5:30
वणी पोलिसांना शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
यवतमाळ : रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी शहरातील रजानगर व मोमीनपुरा भागात एकाचवेळी धाडी टाकून सुमारे ३७० किलो गोमांस जप्त केले. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.
या भागात नेहमीच गोवंशाच्या कत्तली करून गोमांसाची विक्री केली जाते. यापूर्वीही या भागात पोलिसांनी धाडी टाकून कारवाया केल्या. परंतु तरीही हा प्रकार थांबत नव्हता. पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून गोवंशाची कत्तल सुरूच होती. वणीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्याम सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे, नायक पोलीस अशेाक टेकाडे, हरिंद्रकुमार भारती, पोलीस शिपाई विशाल गेडाम, अमोल अनेलवार, महिला पोलीस शिपाई प्रगती काकडे, छाया उमरे यांनी रजानगर व मोमीनपुरा भागात एकाचवेळी धाड टाकली.
या धाडीत सात जणांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याजवळून ३७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. मोहम्मद नासीर अब्दुल रशीद (५१), मोहम्मद अनिस अब्दुल रशिद कुरेशी (४८), मोहम्मद कैसर अब्दुल अजीज कुरेशी (४९), अब्दुल वासे अब्दुल वाहिद (२३) सर्व रा. मोमीनपुरा व मोहम्मद इस्तेयाक अब्दुल वाहब कुरेशी, रा. रजानगर वणी अशी आरोपींची नावे आहेत.
गोवंशाची कत्तल थांबविणार
वणी शहरातील काही विशिष्ट भागामध्ये गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस मोठ्या प्रमाणात विकले जाते. गोवंशाची कत्तल करणे, हे कायद्याने गुन्हा आहे. तरीही हा प्रकार सुरू आहे. यापूर्वीदेखील या भागात धाडी टाकून कारवाया करण्यात आल्या. मात्र यापुढे अशी कत्तल होऊ देणार नाही, आरोपींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करू, असे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी सांगितले.
खरबडा परिसर बनले तस्करीचे केंद्र