पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टवर दरमहा ३९ लाखांची ‘उलाढाल’

By admin | Published: November 26, 2015 02:36 AM2015-11-26T02:36:52+5:302015-11-26T02:36:52+5:30

दरमहा ३९ लाख रूपयांची उलाढाल असलेल्या पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची बोली लावली जात आहे.

39 lakhs 'turnover' per month on pimpakhuti RTO check post | पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टवर दरमहा ३९ लाखांची ‘उलाढाल’

पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टवर दरमहा ३९ लाखांची ‘उलाढाल’

Next

३५ खासगी मजूर नेमले: ‘सबमिशन’साठी बोली, एसीबी गप्प का ?
यवतमाळ : दरमहा ३९ लाख रूपयांची उलाढाल असलेल्या पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची बोली लावली जात आहे. हे सबमिशन दिल्यानंतरच येथील ड्युटीची संधी वरिष्ठांकडून दिली जाते. या चेक पोस्टवर वसुलीसाठी पिंपळखुटीतील ३५ खासगी मजूर कार्यरत आहेत. याशिवाय साहेबांच्या मर्जीतील पाच माणसांचीही येथे वर्दळ असते. याकडे यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.
पिंपळखुटी चेक पोस्टवर राज्यात येणारी वाहने आणि राज्यबाहेर जाणारी वाहने असे दोन नाके आहे. येथे स्वतंत्र वाहतूक निरीक्षकांची नेमणूक केली जाते. अकोला येथील एक अधिकारी, यवतमाळातून दोन, वाशिम एक आणि अमरावतीतील चार वाहतूक निरीक्षकांची आळीपाळीने ड्युटी लावली जाते. ही सायकल तोडून ड्युटी हवी असल्यास संबंधित अधिकाऱ्याला दुप्पट सबमिशन द्यावे लागते. यात डेप्युटीला तीन लाख, सहायकाला दीड लाख दिले जाते. या मार्गावरून जाणाऱ्या दहाचाकी वाहनाला २०० रुपये, १२ ते १४ चाकी वाहनाकडून ५०० रुपये, ट्रेलरकडून पाच हजार आणि बंद कंटेनर यातून मोठ्या प्रमाणात मासांची तस्करी केली जाते. त्यासाठी २५ हजार रुपये वसूल केले जातात. अधिकाऱ्यांच्या आठ तासाच्या ड्युट्या असल्यातरी ते मनमर्जीप्रमाणे सलग २४ ते ४८ तासापर्यंत ड्युटी करताना दिसतात.
वसुलीचा सर्व कारभार खासगी पाच लोकांकडून केला जातो. त्यासाठी त्यांंना महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पगार देण्यात येतो. या व्यतिरिक्त पिंपळखुटीतील रोजंदारी दंडेवाल्या मुलांना २०० रुपये आणि एडीसी (पैसे वसूल करणाऱ्यांना) ५०० रुपये रोज दिला जातो. हे सर्व खासगी कर्मचारी दिवसाकाठी हजार ते पाच हजारापर्यंतचा वैयक्तिक गल्ला जमा करतात. या व्यतिरिक्त संपूर्ण आठ तासात किमान दहा ते पंधरा लाख रुपये गोळा होत असल्याचे सांगण्यात येते. याचे वाटप करताना डेप्युटीला ५० हजार, सहायकाला एक लाख व प्रादेशिकला एक लाख या प्रमाणे दिवसाकाठी वाटा दिला जातो. महिन्याकाठी येथे ३९ लाखांची उलाढाल होते. यात विविध क्षेत्रातील घटकांचा वाटा ठरलेला असतो. त्यात मोठा शेअर राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा राहात असल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार राजरोस सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

‘सज्जन’ अधिकाऱ्याकडून रसद
यवतमाळ डेप्यटी आरटीओ कार्यालयातच पदोन्नती मिळालेल्या सज्जन अधिकाऱ्याने ‘रंगेहात’ पकडले जाऊ नये म्हणून रसद पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या माध्यमातून महिन्याकाठी आठ ते नऊ लाखांचा गल्ला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पिंपळखुटी चेक पोस्टवर गेल्या काही वर्षात एकदाही ‘जाळे फेकले’ गेले नाही. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याबाहेरून रनिंग जाळ्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तोही यशस्वी झाला नाही.

Web Title: 39 lakhs 'turnover' per month on pimpakhuti RTO check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.