३९६ गावांना ‘अकाली’ तडाखा

By admin | Published: March 2, 2015 02:03 AM2015-03-02T02:03:03+5:302015-03-02T02:03:03+5:30

वादळ, पाऊस आणि गारांमुळे जिल्ह्यातील ३९६ गावांना जबर तडाखा बसला. रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. १७ हजार हेक्टरातील पिके आडवी झाली.

396 villages hit 'Akali' | ३९६ गावांना ‘अकाली’ तडाखा

३९६ गावांना ‘अकाली’ तडाखा

Next

यवतमाळ : वादळ, पाऊस आणि गारांमुळे जिल्ह्यातील ३९६ गावांना जबर तडाखा बसला. रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. १७ हजार हेक्टरातील पिके आडवी झाली. फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. वीज कोसळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना बिटरगाव (ता.उमरखेड) येथे घडली. पांडुरंग मल्हारी चिकणे, असे मृताचे नाव आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात निसर्ग प्रकोपाने तांडव केले. सतत १७ दिवस जिल्ह्यात गारपीट झाली. यावर्षी मार्च सुरू होताच वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होत आहे. हवामान खात्याने ३ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. जणू झड लागल्यागत पाऊस गेली दोन दिवसांपासून सुरू आहे. सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात ५३.८ मीमि एवढी करण्यात आली आहे.
पावसाच्या अतिरेकाने काढणीला आलेला गहू आणि हरभरा ही दोन्ही प्रमुख पिके संकटात सापडली आहेत. गारांचा वर्षाव झाल्याने हरभऱ्याचे घाटे गळाले, तर गव्हाच्या ओंब्या फुटल्या आहे. वाऱ्यासह आलेल्या पावसाने गहू मातीमोल झाला आहे. हरभऱ्याची अवस्था गव्हासारखीच झाली आहे. हा पाऊस आणखी असाच सुरू राहिल्यास रबीचे पीक घरात येणारच नाही. यामुळे शेतकरी कुटुंब धास्तावले आहे.
गहू, हरभऱ्यासोबतच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक १७७ हेक्टरचे नुकसान संत्रा पिकाचे झाले आहेत. वादळी वाऱ्याने संत्रा खाली पडला. यासोबतच आंब्याचा मोहोर गारांनी पूर्णत: गळाला. डाळींब आणि भाजीपाला पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. सांबार, पालक, मेथी आदी पालेभाज्या सडल्या.
जिल्ह्यात आठ हजार ४९ हेक्टरवरील हरभरा, तर आठ हजार ९५८ हेक्टरवरील गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. यवतमाळ, बाभूळगाव, पुसद, आर्णी, दारव्हा, नेर, उमरखेड तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका बसला. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. पुसद तालुक्यातील माळपठार, उमरखेड तालुक्यातील बंदी भागातही प्रचंड नुकसान झाले आहे. (शहर वार्ताहर)

शेतकरी पुन्हा आसमानी संकटात
पुसद : तालुक्यात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने शेतकरी पुन्हा आसमानी संकटात सापडला आहे. दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून या पावसाचा फटका दोन हजार हेक्टरवरील गव्हाला बसला. हरभरा, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले. पुसद तालुक्यात यंदा तीन हजार ७०० हेक्टरवर गहू, सात हजार ५०० हेक्टरवर हरभरा, दीडशे हेक्टवर संत्रा आणि २५० हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र शनिवारच्या या पावसाने संपूर्ण पीकच उद्ध्वस्त केले. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे गहू झोपला असून हरभऱ्याचे घाटे फुटून जमीनदोस्त झाले आहे. या वादळामुळे तांत्रिक बिघाड होऊन शहरातील वीज पुरवठा तब्बल १२ तास खंडित झाला होता. वीज वितरणचे कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

उमरखेडमध्ये विक्रीसाठी आणलेला कापूस ओला
उमरखेड : उमरखेड तालुक्याला वादळी पावसाचा प्रचंड तडाखा बसला असून गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच विक्रीसाठी उमरखेड येथे शेतकऱ्यांनी आणलेला कापूसही ओला झाला. गेल्या चार दिवसापूर्वी पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू झाली. शेतकऱ्यांनी आपला कापूस घेऊन उमरखेड गाठले. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने उभी केली. मात्र पावसामुळे संपूर्ण कापूस ओला आहे.
नेर : तालुक्यातील ९१ गावांना अकाली पावसाचा तडाखा बसला असून या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संत्रा, आंबा गळून पडला आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. प्रशासनाने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आहे.

Web Title: 396 villages hit 'Akali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.