४० गावातील नागरिक सोसत आहे असह्य वेदना
By admin | Published: January 9, 2016 02:59 AM2016-01-09T02:59:08+5:302016-01-09T02:59:08+5:30
परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे.
पारवा : परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे. लाखो रुपये खर्च करून उभी झालेली ही वास्तू बेवारस स्थितीत आहे. बसस्थानकाच्या आवारात बस थांबणे आणि पुढे निघून जाणे एवढ्यापुरताच उपयोग या ठिकाणी होतो आहे.
आठ वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या आवाराचे डांबरीकरण करण्यात आले होते. यानंतर साधी डागडुजी करण्याचेही सौजन्य महामंडळाने दाखविले नाही. आता जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एसटी बस आवारात पोहोचते त्यावेळी त्यातील प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे पायदळ निघालेल्या नागरिकांनाही अपघात होण्याची भीती आहे.
बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात अंधार असतो. वीज पुरवठा खंडित झाला असल्याने एकही दिवा बसस्थानकात नाही. रात्रीच्यावेळी बसस्थानकात थांबण्याची कुणी हिम्मत करत नाही. या दुरावस्थेमुळेच बसस्थानकाच्या आवारात शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयही याठिकाणी नाही. उपहारगृह बांधल्यापासूनच सुरू झालेले नाही. सहा महिन्यांपूर्वी आमदार राजू तोडसाम यांनी या बसस्थानकाची पाहणी करून ‘अच्छे दिन’ची आशा पल्लवीत केली होती. मात्र अजून तरी हा मुहूर्त निघालेला नाही.
या बसस्थानकावरून दररोज ४५ ते ५० फेऱ्या धावतात. यात लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, मांडवी, किनवट, आदिलाबाद, आर्णी यासह नागपूर आणि नांदेडसाठीही येथून बसची ये-जा सुरू असते. यातील काही बसेस तर गेली २० वर्षांपासून येथून धावतात. यानंतरही बसस्थानकामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. (वार्ताहर)