४० हजार मेट्रिक टन खतसाठा
By admin | Published: May 21, 2017 12:29 AM2017-05-21T00:29:43+5:302017-05-21T00:29:43+5:30
जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.
गरज केवळ पावणे दोन लाखाची : जिल्ह्यातून खत टंचाई होणार हद्दपार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाईची शक्यता दुरावली आहे.
जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७३ हजार ६०० मेट्रिक टन खताची गरज आहे. त्यात ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाई हद्दपार होणार आहे. खरिपासाठी जिल्ह्याला ७२ हजार ३०० मेट्रिक टन युरिया, १३ हजार २०० मेट्रिक टन एमओपी, २८ हजार मेट्रिक टन एसएसपी, १३ हजार ६०० मेट्रिक टन डीएपी, तर ४६ हजार ५०० मेट्रिक टन संयुक्त खत मंजूर झाले आहे. हे खत जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात खत टंचाई जाणवण्याची शक्यता दुरावली आहे.
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३ लाख ५१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात नऊ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बियाणे, खत आणि लावगडीचे नियोजन केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व भीस्त मृगावर अवलंबून राहणार आहे. कारण जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली आहे. उर्वरित ८३ टक्के शेती अद्याप निसर्गावर अवलंबून आहे.
विहिरी, बोअरव्दारे ५० हजार हेक्टरचे सिंचन
जिल्ह्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओलीत करीत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात विहीर, बोअर खोदली. या विहिरी आणि बोअरव्दारे ४९ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. विविध प्रकल्पांच्या कालव्यांव्दारे प्रत्यक्षात केवळ २४ हजार ५०० हेक्टर शेतीच ओलिताखाली येऊ शकली आहे.
चार लाख हेक्टवर कापूस
यावर्षीच्या खरिपात जवळपास चार लाख पाच हजार हेक्टरवर कपाशी, तर दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. बीटी कपाशी बियाण्याची तब्बल २१ लाख ५० हजार पॉकिटे, तर सोयाबीनचे एक लाख १६ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. महाबिजचे सोयाबीनचे १८ हजार क्विंटल बियाणे तूर्तास उपलब्ध आहे.