४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २३६ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:14 PM2017-12-03T22:14:37+5:302017-12-03T22:15:07+5:30
जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.
जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफीची संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती होईल, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात अद्याप एक छदामही त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. आयटी विभागाने यादीत अनेक त्रुठया काढल्याने कर्जमाफीचे गुऱ्हाळ लांबले होते. गत आठ दिवसांपासून जिल्हा बँकेचे गटसचिव ४१ हजार शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करीत होते. आता एकदाची ही छाननी संपली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये जमा झाले आहेत.
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी संपल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६९ हजार शेतकºयांच्या नावांची दुसरी यादी आली. या यादीची आता छाननी करण्यात येत आहे. त्यातील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम गटसचिव करीत आहे. सर्व त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे. मात्र त्यासाठी आणखी नेमका किती कालावधी लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे.
राष्ट्रीयीकृत बँका माघारल्या
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. त्यांची आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या याद्या अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेणारे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.