जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:06 AM2018-05-12T00:06:47+5:302018-05-12T00:06:47+5:30
जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आखून दिले. त्यानुसार पहिल्या टप्पयात ९ मे रोजी पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, वित्त आणि महिला व बालकल्याण विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. यात बांधकाम आणि पशुसंवर्धन विभागातील प्रत्येकी १२ कर्मचाऱ्यांची बदली झाली. याशिवाय महिला व बालकल्याण विभागातील पाच, कृषीमधील तीन आणि पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. सिंचन विभागातील मात्र एकाही कर्मचाऱ्याची पहिल्या टप्प्यात बदली झाली नाही.
आता दुसऱ्या टप्प्यात १४ मे रोजी सामान्य प्रशासन व पंचायत विभागातील, तर १५ मे रोजी प्राथमिक शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती शिक्षकांच्या बदल्यांची. कारण गेल्या तीन वर्षांपासून काही ना काही कारणाने या बदल्या रखडल्या होत्या. यावर्षीही काही संघटनांनी राज्य स्तरावर मोर्चा काढून बदलीला विरोध दर्शविला होता. मात्र शासन आणि प्रशासन बदली धोरणावर ठाम आहे. त्यामुळे १५ मे रोजी होणाऱ्या शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किमान ४००० हजार शिक्षकांच्या बदल्या
जिल्ह्यात सात हजार ७६६ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पाच हजार ३३३ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. या सर्वांच्या १५ मे रोजी समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहे. यात किमान चार हजार ते चार हजार २०० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आणि सहायक शिक्षकांचा समावेश असणार आहे. याशिवाय ऊर्दू माध्यमाचे १६९ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्यांच्याही बदल्या होणार आहेत.