‘डेहणी’साठी मिळविणार ४२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:02 PM2017-10-28T23:02:57+5:302017-10-28T23:03:09+5:30
बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा ठिबक सिंचन प्रकल्पासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळवून दिला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा ठिबक सिंचन प्रकल्पासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळवून दिला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत हा निधी प्राप्त करून घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पाचे काम २००९ पासून सुरू आहे. नेर आणि बाभूळगाव तालुक्यातील २० गावांमधील सहा हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन टप्प्यात हे काम होत आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार ८०० हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत आहे. बाभूळगाव तालुक्याच्या सहा गावांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, मांगुळ, माणिकवाडा, धनज, कुºहेगाव, ब्राह्मणवाडा आदी सात अशा एकूण १४ गावांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील कामांसाठी निधीची अडचण येत आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ही बाब पुढे आली. त्यामुळे या कामांसाठी लागणारा ४२ कोटींचा निधी प्राप्त करून घेतला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी म्हटले आहे.