वणीत मारहाण करून जिनिंग व्यवस्थापकाचे ४५ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:06+5:30
सदर रक्कम त्यांनी बॅगमध्ये भरून ते स्कुटीने निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील इंदिरा जिनिंगकडे निघाले. वणी-वरोरा बायपासवरून ते निळापूर मार्गाकडे वळल्यानंतर अयफाज जिनिंगपुढे मागाहून येणाऱ्या इंडिगो कारमधील दोघांनी खाली उतरून मनिष जंगले यांना अडविले. लगेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील ४५ लाख रूपये ठेऊन असलेली बॅग हिसकावली व ते पुन्ह कारमध्ये बसले. कारमध्ये एकूण तिघेजण असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील ब्राम्हणी फाट्याजवळील इंदिरा कॉटन जिनिंगच्या सुपरवायझरजवळील ४५ लाख रूपये लंपास करण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास ब्राम्हणी फाट्यावर घडली.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी व पथकाने घटनास्थळी रात्री भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एसपींच्या मार्गदर्शनात आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.
निळापूर-ब्राम्हणी रोडवर मामराज अग्रवाल यांचे इंदिरा कॉटन जिनिंग आहे. शनिवारी दैनंदिन व्यवहाराकरिता लागणारी रक्कम काढण्यासाठी जिनिंगचे सुपरवायझर मनिष जंगले हे दुपारी वणीतील बँक ऑफ इंडिया या बँकेत पोहोचले. तेथे त्यांनी ४५ लाख रूपयांची रक्कम बँकेतून काढली. सदर रक्कम त्यांनी बॅगमध्ये भरून ते स्कुटीने निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील इंदिरा जिनिंगकडे निघाले. वणी-वरोरा बायपासवरून ते निळापूर मार्गाकडे वळल्यानंतर अयफाज जिनिंगपुढे मागाहून येणाऱ्या इंडिगो कारमधील दोघांनी खाली उतरून मनिष जंगले यांना अडविले. लगेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील ४५ लाख रूपये ठेऊन असलेली बॅग हिसकावली व ते पुन्ह कारमध्ये बसले. कारमध्ये एकूण तिघेजण असल्याचे सांगितले जाते. ही कार पुन्हा वणी-वरोरा बायपासवर आली. त्यानंतर ती कुठे निघून गेली, याची मात्र अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, मनिष जंगले यांनी यासंदर्भात जिनिंगच्या मालकांना माहिती दिली. त्यानंतर वणीच्या पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची पोलिसांना हकीकत सांगितली. लगेच एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी लुटारूंच्या शोधासाठी वेगवेगळी पथके गठीत करून लुटारूंच्या शोधात या पथकांना रवाना केले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत लुटारूंचा थांगपत्ता लागला नव्हता. वृत्तलिहिस्तोवर लुटारूंचा सुगावा लागलेला नव्हता.