‘मार्ड’च्या ४५ डॉक्टरांना निलंबनाची नोटीस जारी
By admin | Published: March 23, 2017 12:05 AM2017-03-23T00:05:22+5:302017-03-23T00:05:22+5:30
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी
संपात सहभाग : कर्तव्यावर हजर होण्यासाठी डीनचा ‘अल्टीमेटम’
यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी व कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी अशा ४५ डॉक्टरांना अधिष्ठातांनी संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून निलंबनाची नोटीस बजावली आहे. या डॉक्टरांना कर्तव्यावर हजर होण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
धुळे येथील रुग्णालयात डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी अमानुष मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही २० मार्चपासून संपात सहभागी झाले आहे. त्यांच्या या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा देत बुधवारी आपले खासगी दवाखाने बंद ठेवले होते. डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. दरम्यान निवासी डॉक्टरांचा हा संप बेकायदा ठरवित मंगळवार २१ मार्च रोजी अधिष्ठातांनी त्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले होते. हजर न झाल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नोंदणी रद्द करणे, निवासी डॉक्टर पदावरून निलंबित करणे या सारखी कारवाई करण्याचा इशारा नोटीस द्वारे देण्यात आला होता. (कार्यालय प्रतिनिधी)
संप सुरूच राहणार - मार्ड
दरम्यान निलंबनाच्या नोटीसला भीक न घालता निवासी डॉक्टरांचा संप मागण्या मान्य होईस्तोवर सुरूच राहील, असे ‘मार्ड’च्यावतीने ‘लोकमत’ला सांगण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्यांचाही उहापोह केला. डॉक्टरांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावे, वैद्यकीय महाविद्यालयात सर्वत्र सुरक्षा रक्षक नेमले जावे, केवळ दोन नातेवाईकांना प्रवेश द्यावा, पदव्युत्तर विद्यार्थी काम करीत असलेल्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, मुख्य प्रवेशद्वारावर सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करावे, रात्री ११ नंतर रुग्णालयाचे सर्व प्रवेशद्वार बंद करून केवळ एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात यावे, तेथे सुरक्षा अलार्म सिस्टीम बसविण्यात यावी, औषधाची विल्हेवाट, रुग्ण हलविणे व अन्य कामे सुरळीत पार पाडण्यासाठी चतुर्थ श्रेणीचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, रुग्णाशी संबंधित कामे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी करावी, त्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी, सर्व ठिकाणी पूर्णवेळ लिफ्ट मॅनची नियुक्ती करावी, सामाजिक कार्यकर्त्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र, गणवेश देण्यात यावा, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ते समजले जाऊ नये, पोलीस चौकीमध्ये पूर्णवेळ सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात ठेवावे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज पुरवठा, नियमित वेतन यावर भर द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
खासगी दवाखाने बेमुदत बंदचा निर्णय
‘मार्ड’च्या संपाला पाठिंबा देणाऱ्या खासगी डॉक्टरांनी या संपातील आपला सहभाग आणखी तीव्र करीत गुरुवारपासून राज्यव्यापी खासगी दवाखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयएमएचे सचिव डॉ. नीलेश येलनारे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.