राज्यातील ४५ तालुके पाण्यासाठी आसुसलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:24 PM2018-09-19T12:24:30+5:302018-09-19T12:26:53+5:30
आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही. पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी श्ोतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. त्यातही भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
राज्यभरात एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विदर्भात ४० लाख हेक्टर क्षेत्रात पेरा आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली. आॅगस्टपर्यंत हे पीक जेमतेम होते. आॅगस्टच्या अखेरच्या आठवडयात पावसाने राज्याकडे पाठ फिरविली. २० ते २५ दिवसांपासून पाऊसच नाही. ओलिताची सोय आहे तेथे वीज उपलब्ध नाही. यामुळे ओलित करायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
अपुरा पाऊस झालेल तालुके
नांदगाव, देवळी (नाशिक), जळगाव, मुक्तीनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), उरण (रायगड), शिरपूर, शिंदखेड (धुळे), शहदा (नंदूरबार), नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, धनसावंगी (जालना), पाटोदा, अष्टी, धारूर (बिड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगोली (हिंगोली), देऊळगावराजा (बुलडाणा) या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही नाही
तीन तालुक्यात निम्मा पाऊस
गत तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या तीन तालुक्यात कमी पाऊस पडतो आहे. यावर्षी पुन्हा कमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी ५० टक्केच्या आतमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यात ४८ टक्के, राळेगाव ४८ टक्के, यवतमाळ ५४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यावर्षी नैऋत्य मोसमी वारे न येता पश्चिम आणि पूर्वेकडून अरबी समुद्रातून वारे आले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडला. यात एकसमान दाब नव्हता. यामुळे कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला. याला निसर्गाचा असमतोल कारणीभूत आहे.
-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक