तळेगावच्या शेतकऱ्यांची ४६ जनावरे दगावली
By Admin | Published: May 28, 2016 02:20 AM2016-05-28T02:20:36+5:302016-05-28T02:20:36+5:30
दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
भीषण चाराटंचाई : हिरवा दिसणारा फुटवा ठरला जीवघेणा, अनेक मरणासन्न, २५ डॉक्टरांच्या चमूकडून उपचार
दारव्हा : दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याअभावी जनावरे विक्रीस काढली जात आहे. मात्र चारा छावण्यांचा पत्ता नाही. चारा नसल्याने जंगलात-शेतशिवारात हिरवे दिसणाऱ्या झुडूपांवर जनावरे धाव घेतात, त्यामुळेच आज जनावरांचा घात झाला. ज्वारीचे फुटवे चारा म्हणून खाल्ल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ४६ जनावरांचा मृत्यू झाला. त्यात ४२ गार्इंचा समावेश आहे. या घटनेने तळेगावातील पशुपालक हवालदिल झाला आहे.
फुटवे खाल्ल्याने तब्बल ४६ जनावरे दगावल्याची घटना दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. डोळ्यासमोर पटापट मरणारी जनावरे पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाही. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २५ जणांच्या पथकाकडून उपचार सुरू असून अनेक जनावरे वाचविण्यात यश आले आहे. शेतात मृत जनावरांचा खच पाहून तळेगाववर शोककळा पसरली होती.
तळेगाव येथील शेतकरी अतुल सराफ यांनी आपल्या शेतात रबीची ज्वारी पेरली होती. काही दिवसापूर्वी या ज्वारीची कापणी करण्यात आली. त्यानंतर या ज्वारीला हिरवेगार फुटवे फुटले. दरम्यान शुक्रवारी गावातील सुमारे ३५० जनावरे चरण्यासाठी नेहमीप्रमाणे गायरानाकडे निघाले. परिसरात सध्या भीषण चारा टंचाई आहे. जंगलातही चारा उपलब्ध नाही. त्यामुळे गुराख्याने आपली जनावरे अतुल सराफ यांच्या शेतात नेली. त्या ठिकाणी जनावरांनी हिरवेगार दिसणारे कोवळे फुटवे खाल्ले आणि तेथेच घात झाला. काही वेळातच जनावरांचे पोट फुगून खाली कोसळू लागली. हा प्रकार गावात माहीत होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शेतात ठिकठिकाणी मरणासन्नजनावरे दिसून आली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदारांना या घटनेची माहिती देण्यात आली. अवघ्या काही तासातच पशुधन विकास अधिकाऱ्यांचे २५ डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले. तत्काळ उपचार सुरू झाले. परंतु तोपर्यंत ४० गाई, दोन गोऱ्हे आणि चार म्हशी ठार झाल्या. इतर जनावरांवर उपचार सुरू करण्यात आले. या पथकात तालुका पशुधन विकास अधिकारी जी.के. चव्हाण, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. पोटे, डॉ. सोयाम, डॉ. बावस्कर, डॉ. लाडखेडकर, डॉ. मस्के आदींचा समावेश आहे. सोडियम थायोसल्फेट आणि अॅट्रोफिन सल्फेटचे उपचार सलाईनद्वारे केला जात आहे. तहसीलदार पी.एस. राऊत, गटविकास अधिकारी संजय गुहे, ठाणेदार अनिल गौतम, ग्रामसेवक प्रदीप ठाकरे, तलाठी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. वृत्तलिहेस्तोवर मृत जनावरांचा पंचनामा आणि गंभीर जनावरांचे उपचार सुरू होते. (प्रतिनिधी)
या शेतकरी-शेतमजुरांची दगावली जनावरे
तळेगाव येथील मजीद खान न्यामत खान यांच्या चार म्हशी, विठ्ठल गायकवाड यांच्या दोन गाई तर प्रदीप विष्णू लेवे, अनंता वासुदेव दांडेकर, वसंता जाधव, महादेव आडे, डोमा राठोड, प्रल्हाद गोवडे, सुनील जाधव, नितेश घोडमारे, वसंत धारणे, दुधराम जाधव, प्रकाश मुलके, सुरेश मेश्राम, ज्ञानेश्वर खोडे, श्रीकृष्ण डफडे, हरिदास जांभोरे, अजय राठोड, पांडुरंग लेवे, गोविंद जाधव, सुनील जाधव, सुरेश खोडे, प्रमोद लेवे, मदन काळबांडे, पांडुरंग निंबेकर, गणेश घरत, सखाराम शिंदे, साहेबराव नारनवरे, जिजाबाई गायकवाड, पांडुरंग जाधव, भगवान चव्हाण, काशीराम जाधव, गजानन जाधव यांच्या प्रत्येकी एक गाईचा समावेश आहे.
फुटव्यात असते हायड्रोजन सायनाईड
ज्वारीचे पीक कापल्यानंतर थुटांना पाणी मिळाल्यास त्यातून हिरवेगार कोंब बाहेर येतात. यालाच फुटवे असे म्हणतात. या फुटव्यात हायड्रोजन सायनाईड या नावाचे विष असते. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवागार चारा पाहून जनावरे तुटून पडतात आणि घात होतो.