राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईसाठी तब्बल ४६३ कोटींचे कंत्राट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:33 PM2017-11-29T12:33:30+5:302017-11-29T12:35:27+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी एवढी आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी एवढी आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील बसस्थानक, एसटी वर्कशॉप, आगार आदींच्या साफसफाईचे कंत्राट जिल्हास्तरावर विभाग नियंत्रकांच्या अधिकारात दिले जात होते. स्थानिक पातळीवरील सुशिक्षित बेरोजगार संघटना, बचत गट व महिलांच्या अन्य संस्थांना हे छोटेछोटे कंत्राट मिळत असल्याने रोजगार निर्मिती होत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी महामंडळात ही पद्धत अवलंबिली जात आहे. परंतु यावर्षीपासून या पद्धतीला ब्रेक लावत ४६३ कोटी रुपयांचे साफसफाईचे कंत्राट पुण्यातील एकाच संस्थेला देण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयाने घेतला. पुढील तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. राज्यातील २६८ बसस्थानके, ३१ विभाग नियंत्रक कार्यालये, तीन मध्यवर्ती कार्यशाळा, ३० विभागीय कार्यशाळा, १८ हजार ७०० एसटी बसेस, विश्रामगृहे, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, डास निर्मूलन फवारणी आदी जबाबदारी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी या कंपनीला कामाचे आदेश जारी करण्यात आले असून २ डिसेंबरपर्यंत त्यांना सर्व बसस्थानकांवर आपली यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
एकाच कंपनीला साफसफाईचे कंत्राट दिले गेल्याने राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगार संघटना, बचत गट, महिला संस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. एका कंपनीच्या भल्यासाठी आमचा रोजगार हिरावल्याची भावना बचत गटाच्या महिला व सुशिक्षित बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत.