महिलांवरील अत्याचाराला ब्रेक कधी?, राज्यात ४७ हजार गुन्ह्यांची नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 08:52 PM2024-06-29T20:52:03+5:302024-06-29T20:53:25+5:30
आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव : बाहेरच नव्हे तर घराची चाैकटही असुरक्षित
सूरज पाटील, यवतमाळ : महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदे कठाेर करण्यात आले. मात्र, तरीही अत्याचाराच्या घटनांचा आलेख हा वाढतच चालला आहे. २०२३ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ४७ हजार ३८१ गुन्हे घडले असून, त्याची नाेंद पाेलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पतीसह नातेवाइकांकडून झालेले क्रूर कृत्य, विनयभंग, अनैतिक व्यापार आदींचा समावेश आहे. ही धक्कादायक आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून समाेर आली आहे.
पूर्वी जनजागृतीअभावी व बदनामीच्या भीतीने अत्याचार सहन केला जात होता. मात्र, वाढत्या जनजागृतीमुळे अल्पवयीन मुलींचे पालक व महिलादेखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांवर केवळ बाहेरच अत्याचार होतात, असे नाही तर घराच्या चौकटीतही महिला सुरक्षित नाहीत. जवळच्या नातेवाइकांकडून व पतीकडूनही अत्याचार केला जातो. २०२१ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ३९ हजार ५२६ गुन्हे नोंदविण्यात आले हाेते. २०२२ मध्ये ४५ हजार ३३१ तर, २०२३ मध्ये ४७ हजार ३८१ गुन्ह्याची नाेंद आहे. २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये गुन्हे दाेन हजार ५०ने वाढले आहेत. बलात्काराचे ७,५२१, अपहरण व पळवून नेल्याचे ९,६९८, विनयभंग १७,२८१ आणि पती व नातेवाइकांकडून हाेणाऱ्या अत्याचाराच्या ११,२२६ घटना घडल्या आहेत.
महिला व मुलींवर जवळच्या नातेवाइकांकडूनही अत्याचार केला जाताे. अशा घटनांमुळे पवित्र नात्यालाही काळिमा फासला जात आहे, ही सर्वाधिक चिंताजनक बाब आहे. महिलांवर हाेणाऱ्या अत्याचाराला ब्रेक लागणार तरी कधी?, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
अशी आहे गुन्ह्यांची नाेंद आकडेवारी
गुन्हे - २०२२ - २०२३
बलात्कार - ७,०८४ - ७,५२१
अपहरण - ९,२९७ - ९,६९८
हुंडाबळी - १८० - १६९
पती व नातेवाईक - ११,३६७ - ११,२२६
विनयभंग - १६,०८३ - १७,२८१
अनैतिक व्यापार - ६५ - १७४
इतर - १,२५५ - १,३१२