४८५ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:00 PM2019-01-23T22:00:49+5:302019-01-23T22:01:45+5:30
केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नव्या रस्ते-पुलांचे बांधकाम, विस्तारिकरण, रुंदीकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले होते. त्यापैकी दहा कामांना केंद्रीय रस्ते निधीतून मंजुरी देण्यात आली. या कामांचे बजेट ४८५ कोटी ७६ लाख रुपयांची आहे. त्यामध्ये वाशिम-पुसद-गुंज-महागाव ३८ कोटी, उमरखेड-चुरमुडा-दगडधर-चिल्ली २५ कोटी, बोदेगाव ते धामणगावदेव २० कोटी, घाटंजी ते पारवा ६५ कोटी, बोरी-पाटण-मुकुटबन ८४ कोटी एक लाख, वणी-कायर मार्ग ५८ कोटी ७५ लाख, चामरगाव-शिरपूर-कळमना-चंद्रपूर ५५ कोटी, खैरी-मार्डी-नांदेपरा-वणी ५४ कोटी, पारवा ते पिंपळखुटी ४९ कोटी १९ लाख आणि यवतमाळ बसस्थानक ते नागपूर बायपास मार्ग ३९ कोटी ७२ लाख रुपये या कामांचा समावेश आहे. आणखीही काही कामे प्रस्तावित आहेत. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नाही. जिल्ह्यात अनेक मार्गांवर नव्या पुलांची, रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता आहे. ही कामे मार्गी लावण्याचा प्रस्ताव आहे.
तेलंगणा-मराठवाडापर्यंत निर्माण होणार कनेक्टिव्हिटी
सीआरएफमधून मंजूर झालेल्या या दहा कामांमुळे जिल्ह्यात आणखी चांगली कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे. लवकरच या कामांच्या निविदा काढल्या जाऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले. या कामांच्या माध्यमातून प्रमुख व इतर जिल्हा मार्गांचे विस्तारीकरण करून ते राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांशी जोडले जाणार आहेत. यवतमाळ शहरातही बसस्थानक ते नागपूर बायपासपर्यंत रस्त्याचे काम केले जाईल. खैरी ते वणी या मार्गाच्या कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वडकीवरून थेट चंद्रपूरकडे जाणाऱ्या वणी बायपासवर जोडले जाणार आहे. अशीच कनेक्टीव्हीटी लगतच्या तेलंगणा राज्यासह मराठवाड्यासाठीही निर्माण केली जाणार आहे.