पत्नीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:26 PM2018-02-21T22:26:31+5:302018-02-21T22:27:22+5:30
पत्नीने केलेली जादूटोण्याची खोटी तक्रार व तिच्याकडून वारंवार होणारी पैशाची मागणी यामुळे तणावात आलेल्या गजानन डाहुले या युवकाने आत्महत्या केली,.........
ऑनलाईन लोकमत
मारेगाव : पत्नीने केलेली जादूटोण्याची खोटी तक्रार व तिच्याकडून वारंवार होणारी पैशाची मागणी यामुळे तणावात आलेल्या गजानन डाहुले या युवकाने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत गजाननच्या चुलत भावाने मारेगाव पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून रात्री उशिरा मृत गजाननची पत्नी भावना डाहुले हिच्यासह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
जोवर मृत गजाननची पत्नी, सासू-सासरे व अन्य लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, तोपर्यंत प्रेत विहीरीबाहेर काढू देणार नाही, अशी भूमिका मंगळवारी टाकळी येथील संतप्त नागरिकांनी घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रेत विहीरीतच होते. याप्रकरणी सायंकाळी मृत गजाननचा चुलत भाऊ नरेश छत्रपती डाहुले याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर रात्री उशिरा गजाननची पत्नी भावना, सासरा प्रकाश राजूरकर, सासू माला राजूरकर, भावनाचा आजोबा अशोक राजूरकर व चुलत मामा बंडू गौरकार यांच्याविरुद्ध गजाननला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
गजानन व भावना या दोघा पती-पत्नीत कोणताही वाद नसताना मागीलवर्षी दिवाळीनंतर भावना तिच्या माहेरी भालर (ता.वणी) येथे वडिलांच्या घरीच राहत होती. गजाननने तिला परत आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र ती नांदण्यासाठी आली नाही. दरम्यान, भावनाच्या आई-वडिलांनी मुलीला पाठवणार नाही, अशी भूमिका घेऊन लग्नात झालेला खर्च म्हणून सात लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करून तुम्हाला अडकवू, अशी धमकी दिली होती. परंतु एवढे पैसे परत करण्याची ऐपत नसल्याने मृत गजाननने पैसे देण्यास नकार दिला. परिणामी भावनाने १७ फेब्रुवारी रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. १९ फेब्रुवारीला पुन्हा भावना व तिच्या नातलगांनी कुंभा बसथांब्यावर गजाननला अडवून सात लाख रुपयांची मागणी केली. तसेच पुन्हा खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे दबावात आलेल्या गजाननने मंगळवारी दुपारी शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी गजाननच्या पार्थिवावर टाकळी येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात शेकडो गावकºयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.