नांदुरा येथे मुख्याध्यापकाकडून पाच विद्यार्थिनींचा विनयभंग
By admin | Published: February 12, 2017 12:13 AM2017-02-12T00:13:08+5:302017-02-12T00:13:08+5:30
पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाने केलेला संतापजनक प्रकार शनिवारी पुढे आला.
गुन्हा दाखल : जिल्हा परिषद शाळेला पोलिसांचा गराडा
बाभूळगाव : पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींशी मुख्याध्यापकाने केलेला संतापजनक प्रकार शनिवारी पुढे आला. तालुक्याच्या नांदुरा (खु.) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. शाळेला पोलिसांचा गराडा पडला होता. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले.
मागील काही महिन्यांपासून मुख्याध्यापक आर. बी. तुमाने (४५) याच्याकडून सुरू असलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यांनी पालकांना सांगितला. यामुळे संतप्त पालक आणि गावकरी शाळेवर धडकले. या बाबीची माहिती होताच पोलिसांचा ताफा शाळेत धडकला. मुख्याध्यापक तुमाने हे शाळेत पोहोचताच पालक आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर आपला रोष व्यक्त करत मारहाण सुरू केली. पोलिसांनी थोडाही विलंब न करता या मुख्याध्यापकाला एका वर्गखोलीत ठेवले. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातील नागरिकही मिळेल त्या साधनांद्वारे तेथे दाखल होत होते.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून यवतमाळ येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, तहसीलदार दिलीप झाडे, बाभूळगावचे ठाणेदार अनिल पाटील, एपीआय किशोर सरोदे, पीएसआय एस.व्ही. पाटोळे, नायब तहसीलदार एम.बी. मेश्राम, सरपंच किरण पंकज कांबळे, माजी सरपंच सचिन महल्ले आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शस्त्रधारी पोलिसांनी मुख्याध्यापकाला खोलीतून बाहेर काढत पोलीस वाहनात कोंबले. मुख्याध्यापक आर. बी. तुमाने याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दंडाधिकाऱ्यांचे आवाहन
महिला ग्रामसेविका, महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, महिला पोलीस पाटील यांनी राष्ट्रीय कार्य समजून गावागावांतील शाळांमध्ये जावून विद्यार्थिनींना विश्वासात घेवून त्यांची विचारपूस करावी. त्यामुळे नांदुरा (खु) येथे जो प्रकार घडला, अशा प्रकाराला आळा घालता येईल. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दिलीप झाडे यांनी केले. (प्रतिनिधी)