पोहरादेवी व धामणगावच्या विकासासाठी ५० कोटी
By admin | Published: July 9, 2017 12:49 AM2017-07-09T00:49:42+5:302017-07-09T00:49:42+5:30
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) आणि धामणगाव देव (ता. दारव्हा) येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) आणि धामणगाव देव (ता. दारव्हा) येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाच्या उच्चाधिकारी समितीने मुंबईत झालेल्या बैठकीत अंतिम मान्यता दिली. या दोन्ही तीर्थस्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी २५ कोटींच्या निधीची अंतिम मान्यता समितीने दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून या क्षेत्रांच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावला.
पोहरादेवी विकास आराखड्याचा प्रस्ताव ९३ कोटींचा आहे. समितीने मान्यता दिलेल्या २५ कोटींच्या निधीतून संत सेवालाल महाराज, नफ्ते पाटील महाराज आणि सेवासागर प्रकल्पाचा विकास केला जाणार आहे. धामणगाव (देव) येथील मुंगसाजी माऊली समाधीसह देवसागर प्रकल्प, वनोद्यान आदी ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे.
मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीत वाशिम व यवतमाळचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदिंनी अनुक्रमे पोहरादेवी व धामणगाव (देव) विकास आराखड्याचे सादरीकरण केले. निधी मंजुरीमुळे पोहरादेवी व धामणगाव (देव) च्या विकासाला चालना मिळणार आहे.
या तीर्थस्थळांचा विकास शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर करण्याचा मनोदय ना. संजय राठोड यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार खासगी आर्किटेक्टकडून हा आरखडा तयार करून घेतला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ना. संजय राठोड यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विंनती करून या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकी सहा कोटींच्या निधीची तरतूद करून घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही भूमिका मांडून या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमित मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता आदी अधिकाऱ्यांनी पोहरादेवी व धामणगाव (देव) विकास आराखडा मंजूर होण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतल्याने या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली, अशी प्रतिक्रिया ना. संजय राठोड यांनी व्यक्त केली.