वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:27+5:30
लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून लॉकडाऊनच्या काळात करोडो रूपयांचे नुकसान सहन करणारी लालपरी अर्थात महामंडळाची एस.टी.बस हळूहळू सावरू लागली आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा मिळाल्यानंतर वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ झाली आहे.
लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. लॉकडाऊनपूर्वी हेच उत्पन्न पाचपटीत होते. डिसेंबर महिन्यात वणी आगाराला एक कोटी २१ लाख ९० हजार ५५८ रूपये, जानेवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ७७ हजार ९२९, फेब्रुवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ८९ हजार ६८२ रूपयांचे उत्पन्न वणी आगाराला झाले. मात्र कोरोनानंतर मार्च महिन्यापासून एसटीच्या उत्पन्नात कमालिची घट झाली. मागील आठवडाभरापासून वणी आगारातील एस.टी.बसेस पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन रस्त्याने धावत आहेत. प्रवाशांचाही एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र येथे पहायला मिळते. सध्यस्थितीत वणी आगाराला एका दिवशी एक लाख १० हजार रूपयापर्यंतचे उत्पन्न होत आहे. वणी आगारातून वणी-यवतमाळ, वणी-नागपूर, वणी-चंद्रपूर या मार्गाने प्रवासी वाहतूक केली जात आहे. दररोज पाच हजार ५०० किलोमीटरचा पल्ला वणी आगारातील बसेस गाठत आहेत. यवतमाळ व नागपुरसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर तासाला बसेस सुटत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात एसटी बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहतुकदारांना झाला. विशेष म्हणजे प्रवासी वाहतूक करताना काही कठोर नियम घालून देण्यात आले होते. परंतु खासगी वाहतुकदारांकडून हे नियम पायदळी तुडविण्यात आले. खासगी वाहनात तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक करण्यात आली.
कर्मचारी पाच महिन्यांपासून वेतनाविना
एसटी बंद असल्याने उत्पन्नात घट आली. त्याचा फटका एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बसला. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतनच देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उसणवारी करून जगण्याची वेळ आली आहे.