अर्ध्या एकरात ५० क्ंिवटल तुरीचे पीक
By Admin | Published: May 21, 2017 12:27 AM2017-05-21T00:27:24+5:302017-05-21T00:27:24+5:30
राबराब राबूनही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तूर पिकविणे अवघड जाते. नेरमधील एका व्यापाऱ्याने
व्यापाऱ्याची अशीही ‘सधन कास्तकारी’ : तूर घोटाळ्याचा भंडाफोड, फौजदारीचे आदेश
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राबराब राबूनही शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल तूर पिकविणे अवघड जाते. नेरमधील एका व्यापाऱ्याने मात्र केवळ १८ आर पेऱ्यात चक्क ४९ क्विंटल तूर पिकविल्याचे उघडकीस आले. तूर चोरी लपविण्याचा हा प्रयत्न व्यापाऱ्याच्या अंगलट आला असून सहकार विभागाने फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारावर अनेक व्यापाऱ्यांनीही तुरी विकल्याचे स्पष्ट होत आहे. यात तब्बल ४०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. त्यामुळे तूर विक्रेत्या शेतकऱ्यांच्या दस्तावेजाची छाननी केली जात आहे. या छाननीत नेरमधील एका व्यापाऱ्याला केवळ १८ आर पेऱ्यात चक्क ४९ क्विंटल तूर पिकल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील १५ केंद्रांवर चौकशी सुरू झाली आहे. प्रत्येक केंद्रावर सहकार उपनिबंधक आणि सहायकांमार्फत तपासणी होत आहे. ३० कर्मचाऱ्यांचे पथक ही तपासणी करीत आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर आत्तापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांनी दोन लाख क्विंटल तूर विकल्याची माहिती आहे. यात चार हजारावर शेतकऱ्यांनी २५ क्विंटलपेक्षा जास्त तुरीची विक्री केली. या शेतकऱ्यांच्या दस्तावेजाची छाननी केली जात आहे. त्यांचा सातबारा आणि लागवड क्षेत्र तपासून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
नेर येथील युवा शेतकरी संघर्ष समितीने शासकीय तूर खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांनीच तूर विकल्याची तक्रार केली होती. दारव्हाचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेल्या अहवालात या केंद्रावर ३११ शेतकऱ्यांनी तीन हजार ९१३ क्विंटल तूर विकली असून त्यात २० व्यापाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले होते.
शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी ठरले उत्तम शेतकरी
नेर येथील चौकशीत अनेक धक्कदायक बाबी समोर आल्या. यात एका व्यापाऱ्याने ३० आर जमिनीतून २९ क्ंिवटल, तर दुसऱ्या व्यापाऱ्याने एवढ्याच जमिनीतून ४९ क्विंटल तुरीचे उत्पन्न घेतल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या व्यापाऱ्याने मक्त्याने शेती करून ३२ क्विंटल उत्पन्न घेतले. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा व्यापारीच उत्तर शेतकरी ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र आता या प्रकरणी प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी सदर व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांचा परवाना निलंबित करण्याचे पत्रही दिले.