५० गावांचा पाणीप्रश्न सुटणार
By admin | Published: April 20, 2017 12:27 AM2017-04-20T00:27:43+5:302017-04-20T00:28:15+5:30
जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली.
तीन प्रकल्पातून पाणी सोडले : नागरिकांच्या आंदोलनानंतर घेतली दखल
यवतमाळ : जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली. यामुळे जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यातून ५० गावांतील पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी अनेक प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. काही गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाल्याने नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी तेथील गामस्थांनी केली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन होता. अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी सायंकाळी तीन प्रकल्पातील पाणी सोडण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यामुळे या प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या ४५ गावांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. प्रथम पाणी सोडल्यानंतरही काही गावापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिक उपोषणाला बसले होते. त्याची दखल घेत सोमवारी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यामुळे उमरखेड तालुक्यातील उंचवडद व तिवडीपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय वाघाडी प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने येळाबारा, सायखेडा आणि बेलखेडा येथील नागरिकांना पाणी मिळणार आहे. अंतरगाव प्रकल्पातून ०.११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने पालोती, पन्हाळगाव व अंतरगाव येथील पाणीटंचाई निवारणास मत मिळणार आहे. (शहर वार्ताहर)