५०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:59 PM2018-08-21T23:59:28+5:302018-08-22T00:00:45+5:30
गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.
दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, नेर, पुसद या सात तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या तालुक्यात एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्याने तर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २०० पट अधिक आहे. अतिपावसाचा पिकांना जबर फटका बसला आहे. कृषी मालाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेत जमिनीतूनच पूर गेल्याने पिके खरडून गेली आहे. जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मालमत्तांचे नुकसान न मोजता येण्याजोगे आहे.
नदी, नाल्यांना आलेला पूर, फुटलेले कालवे आणि खोलगट भागामुळे जिल्ह्यात ६१ हजार ९३० हेक्टरवरील पीक खरडून गेले आहे. हेक्टरी ५० हजारांप्रमाणे ३०९ कोटी रूपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून हेक्टरी नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. २०० किमी रस्ते पुरामुळे वाहून गेले आहेत. दुरूस्तीसाठी २५ कोटी रूपयांचा निधीची गरज आहे.
कालवे दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. सहा हजार ७०६ घरांची पडझड झाली. ५० हजारांप्रमाणे हे नुकसान ३३ कोटींच्या घरात आहे. २५९ जनावरे वाहून गेली आहे. तिघांचा मृत्यू झाला. ७९ लाख ७५ हजार रूपयाची मदत वितरित केली गेली. यात धान्य, कपडे, भांडे, केरोसीनचा समावेश आहे.
वीज वितरण कंपनीचेही नुकसान
पूर पीडित क्षेत्रात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. अनेक खांब कोलमडले, तारा तुटल्या. यातून वीज वितरण कंपनीला तब्बल ५० लाख रूपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला.