‘वसंत’ने पाठविले ५०० कामगारांना रजेवर
By Admin | Published: April 4, 2017 12:12 AM2017-04-04T00:12:06+5:302017-04-04T00:12:06+5:30
तालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे.
अखेरची घरघर : ऊस उत्पादक व कामगारांत खळबळ
अविनाश खंदारे उमरखेड
तालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगारांत एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील पोफाळी येथे १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने वसंत साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. १९७३ साली प्रथम गाळप हंगामापासून २०१५ पर्यंत सतत गाळप होत राहिले. त्यामुळे या परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. परंतु गत काही वर्षांपासून कारखान्याला उतरती कळा लागली. गत २२ महिन्यांपासून कामगारांना वेतन दिले नाही. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. प्रशासन व कामगार संघटनांत अनेक वाद झाले. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
दरम्यान, गतवर्षी वसंत कारखान्याची निवडणूक झाली. सर्व नेत्यांनी एकत्र बसून कारखाना सुरू राहिला पाहिजे, यासाठी निवड अविरोध केली. हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील यांची अध्यक्षपदी तर कृष्णा पाटील देवसरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गतवर्षी क्षमतेएवढे गाळपच झाले नाही. केवळ २३ हजार ५०० टन गाळप होवून कारखान्याचा पट्टा पडला. वसंत कारखान्याची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली. गत २२ महिन्यांपासून कामगारांचे पगार नाही, पाच कोटी वेतनाचे आणि पाच कोटी ग्रॅज्युटीचे घेणे आहे. सोसायटीचे दीड कोटी, फंडाचे दोन कोटी, व्यापारी पेमेंट दोन कोटी अशी १५ कोटींपेक्षा अधिक देणी आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अर्धपगारी रजेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रकार वसंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
ऊस उत्पादकांत रोष
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना रजेवर पाठविले आहे. गत दोन वर्षांपासून गाळप हवे तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय कारखाना कायमचा बंद पाडण्यासाठी तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. उमरखेड तालुक्याची कामधेनू बंद पाडण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप ऊस उत्पादक करीत आहे.
वसंत कारखान्याच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन अधिकारी व कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक संचालक मंडळ व शासनाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
- राजेंद्र खापड
कार्यकारी संचालक,
वसंत साखर कारखाना
वसंत कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना ले आॅफ दिला आहे. परंतु या कामगारांच्या कुटुंबांचा व त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, यासाठी कारखाना प्रशासनाने वसंतला भाडेतत्त्वावर द्यावा. त्यातूनच शेतकरी व कामगारांना दिलासा मिळेल.
- व्ही.एम. पतंगराव
कामगार नेते