भारत-पाक शांततेसाठी ५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:35 AM2018-12-14T10:35:58+5:302018-12-14T10:37:54+5:30
भारत-पाकिस्तानातील सततचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐरणीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, आता या दोन्ही देशात शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी निरागस विद्यार्थी पुढाकार घेणार आहेत.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारत-पाकिस्तानातील सततचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐरणीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, आता या दोन्ही देशात शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी निरागस विद्यार्थी पुढाकार घेणार आहेत. दोन्ही देशातील ५० हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार होत आहे. त्यातील ५ हजार शांतता सैनिक तयारही झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे सैन्य कोणत्याही सरकारने तयार केलेले नाही, तर महाराष्ट्रातील एका ध्येयवादी शिक्षकाने त्याची मुहूर्तमेढ रोवून आठ देशातील शिक्षकांना सहभागी करून घेतले आहे.
रोज शाळेत ‘भारत माझा देश आहे’ असे म्हणताना आपण भारतासाठी काय करतो हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. तोच प्रश्न सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी सुरू केला ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प. व्हॉट्सअपवर लिंक तयार करून या प्रकल्पात देशभरातील शाळांचा सहभाग मिळविला. सहभागाची इच्छा दर्शविणाऱ्या ५८० शाळांपैकी महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, लुधियाना, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील १४८ शाळांची निवड केली. तेवढ्याच शाळा पाकिस्तानातील घेण्यात आल्या. त्यासाठी पाकिस्तानातील रजा वकास, हयात जहान बेग, पुरशरा लक्वी, मुस्तफा रजव्हा, अशफाक वकास या शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून इस्लामाबादमधील रुट इंटरनॅशनल स्कूल, लाहोरमधील मरिहा जेएआयन स्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या १४८ शाळा सहभागी झाल्या.
- असा आहे प्रकल्प
सहा आठवड्यांच्या या प्रकल्पात भारत-पाकिस्तानातील मुलांचा ‘स्काईप’द्वारे ‘वन टू वन’ संवाद घडविण्यात आला. दुसºया आठवड्यात मुलांनी एकमेकांच्या देशातील साम्य आणि फरक, यावर चर्चा केली. तिसऱ्या आठवड्यात जगातील टॉप टेन शांत देशातील शिक्षकांना ‘ग्लोबल स्पिकर’ म्हणून निमंत्रित करण्यात आले. आॅस्ट्रीयातील सुसान गिलका, फिनलंडचे पेक्का ओली, कॅनडातील वर्बितो नेगी, आयर्लंडमधील मेकील पेस्तो, जपानमधील नियो होरियो यांच्यासह डेन्मार्क, न्यूझीलंड, पोर्तुगालमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चौथ्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात संघर्ष का होतो, याची कारणे मुलांनी एकमेकांना सांगितली. पाचव्या आठवड्यात दोन देशातील भांडण आपण कसे थांबवू शकतो, याबाबत मुलांनी आपापल्या परिने उपाय सूचविले. तर सहाव्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानचे संबंध शांततापूर्ण राहण्यासाठी मी काय करणार आहे, याबाबत मुलांनी एकमेकांशी ‘कमिटमेंट’ केल्या. या ५ हजार विद्यार्थ्यांना ‘पीस आर्मी’चे प्रमाणपत्र देण्यात आले. मायक्रोसॉफ्टतर्फे दिल्लीत या प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले. हा प्रकल्प २०३० पर्यंत चार टप्प्यात चालविला जाणार असून ५० हजार विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.
मुले म्हणतात, दोन्ही देशातील बातम्या बघा
दोन्ही देशात शांततामय वातावरण निर्माण होण्यासाठी मुलांनी एकमेकांशी बोलताना महत्त्वाचे उपाय सूचविले. ज्या दिवशी भारताने पाकिस्तानचे सैन्य मारले अशी बातमी येईल, त्या दिवशी पाकिस्तानच्या चॅनलने ती बातमी कशी दाखविली ते पाहायचे. त्यावरून खरे काय ते ठरवायचे, असा उपाय एका मुलाने सूचविला. आपल्या ‘कल्चरल अॅक्टिव्हिटी’ सतत ‘एक्सचेंज’ करण्याचे प्रमाण वाढवावे, असा उपाय दुसऱ्याने सूचविला.