यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 06:07 PM2024-11-11T18:07:44+5:302024-11-11T18:14:06+5:30

धगधगते वास्तव : प. विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

51 farmers commit suicide in Yavatmal district in October; Most victims in Yavatmal and Amravati districts | यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

51 farmers commit suicide in Yavatmal district in October; Most victims in Yavatmal and Amravati districts

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
शासन, प्रशासन, राजकारणी निवडणुकीत व्यस्त अन् मस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित आहे. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ३१ दिवसांत ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 


पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरत आहेत. यावर्षीच्या १० महिन्यांत ९०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २८६ तर अमरावती जिल्ह्यात २०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात १३९, बुलढाणा १९३ व वाशिम जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 


नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे आणि सावकाराचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचून शेतकरी आत्महत्या होत आहेत. सततचा पाऊस, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान त्यामुळे उताऱ्यात घट आल्याने उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करत आहे. 


२१ वर्षांत २१ हजार शेतकरी आत्महत्या 
पश्चिम विदर्भात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तब्बल २०,९८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदत फक्त ९५६८ प्रकरणांत देण्यात आली आहे तर १०,८२२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. ३४९ प्रकरणे वर्षभरापासून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

Web Title: 51 farmers commit suicide in Yavatmal district in October; Most victims in Yavatmal and Amravati districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.