दीड वर्षात एसीबीचे ५२ गुन्हे शाबित; ६२ आरोपींना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 03:16 PM2020-07-14T15:16:07+5:302020-07-14T15:16:46+5:30
जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
गेल्या दीड वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडणे, लाचेची मागणी, अपसंपदा या संबंधी शेकडो गुन्हे दाखल केले. त्यापैकी ५२ गुन्हे शाबित झाले. त्यात ६२ जणांना शिक्षा ठोठावली गेली. त्यामध्ये वर्ग-१ चे १२ तर वर्ग-२ च्या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग-३ च्या ३४ तर वर्ग-४ च्या दोघांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. याशिवाय दोन इतर लोकसेवक व दलाला म्हणून काम करणाºया पाच खासगी व्यक्तींनाही शिक्षा ठोठावली गेली आहे.
गुन्हे शाबित झालेली सर्वाधिक १५ प्रकरणे पोलीस खात्याची आहे. त्या खालोखाल महसूल-भूमिअभिलेख व नोंदणी विभागाची ११, पंचायत समिती पाच, जिल्हा परिषद चार, वन विभाग तीन, नगरविकास (मनपा/सिडको) दोन, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रत्येकी दोन तर विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, प्रादेशिक परिवहन, सहकार व पणन, राज्य परिवहन, सिडको या विभागातील प्रत्येकी एक गुन्हा सिद्ध झाला. आदिवासी विकास विभागातील मात्र एकही प्रकरण गेल्या दीड वर्षात एसीबीला शाबित करता आलेले नाही.
दहा लाखांचा दंड वसूल
गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या ६२ आरोपींकडून दहा लाख ९० हजार ५०० रुपयांची रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक रक्कम नगरविकास पाच लाख एक हजार, महसूल विभाग एक लाख ६५ हजार तर पोलीस विभागाकडून एक लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्वाधिक भंडारा, नाशिकमध्ये
गुन्हे शाबित होऊन शिक्षा झालेली प्रकरणे नांदेड, नाशिक, भंडारा, बीड, चंद्रपूर, मुंबई, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद शहर व ग्रामीण, मुंबई, ठाणे, जळगाव, खामगाव-बुलडाणा, पुणे, सातारा व लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यातही भंडारा, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील प्रकरणे अधिक आहे.