५२ शाळा झाल्या दप्तरमुक्त !

By admin | Published: July 11, 2017 01:08 AM2017-07-11T01:08:21+5:302017-07-11T01:08:21+5:30

शासन, न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरी विद्यार्थ्यांचे दप्तर हलके होत नसताना, दारव्हा तालुक्यातील खेड्या-पाड्यातील ५२ शाळा चक्क दप्तरमुक्त झाल्या आहेत.

52 schools became free | ५२ शाळा झाल्या दप्तरमुक्त !

५२ शाळा झाल्या दप्तरमुक्त !

Next

दारव्हा तालुका : विद्यार्थ्यांसाठी शाळेत जुनी पुस्तके, तर घरी नवी पुस्तके
अविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासन, न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरी विद्यार्थ्यांचे दप्तर हलके होत नसताना, दारव्हा तालुक्यातील खेड्या-पाड्यातील ५२ शाळा चक्क दप्तरमुक्त झाल्या आहेत. दप्तराचे ओझे न वाहताही या शाळांमधील गरिबांच्या मुलांना चक्क पुस्तकांचे दोन-दोन संच हाताळता येतात, तेही मोफत!
ग्रामीण विद्यार्थ्यांविषयी कणव बाळगणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ही किमया घडवून दाखविली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे वाढत आहे. त्यामुळे अनेकांना पाठदुखी, मणक्याचे आजार, मानदुखी असा त्रास होत आहे. एका जनहित याचिकेतून हा प्रकार न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने कठोर निर्देश दिले. दप्तराचे वजन विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या १० टक्के असावे. शहरी शाळांनी विविध उपाययोजना करूनही दप्तर हलके होऊ शकले नाही, हे वास्तव आहे.
मात्र, दारव्ह्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या कल्पकतेतून जिल्हा परिषदेच्या तब्बल ५२ शाळा पूर्णपणे दप्तरमुक्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी त्यांनी ‘आउट आॅफ वे’ प्रयत्न केला नाही. तर नियमांच्या चौकटीतच विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक कामगिरी बजावली. वरिष्ठांना कोणताही नवा निधी मागितला नाही. केवळ एक साधी गोष्ट केली. विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत मिळणाऱ्या पुस्तकांचा त्यांनी उत्तम उपयोग करून घेतला. मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके त्यांनी शाळेतच ठेवून घेतली. उन्हाळी सुटी सुरू होण्यापूर्वी त्या पुस्तकांची डागडुजी करवून घेतली. त्यासाठी पुस्तकबांधणी कार्यशाळा घेतली. वर्षभर वापरलेली पुस्तके फाटली असतील, तर ती चिकटवून घेतली. काही पाने फाटली असतील, तर झेरॉक्स करून लावली. संपूर्ण वर्गाची पुस्तके शाळेतच ठेवून घेतली. आता नवे सत्र सुरू होताच मुलांना सर्व शिक्षा अभियानातून नवी कोरी पुस्तके मिळाली आहेत. ती सर्व पुस्तके मुले शाळेत आणत नाही, घरीच ठेवतात. शाळेत आल्यावर त्यांना शाळेतील जुनी डागडुजी केलेली पुस्तके मिळतात. विशेष म्हणजे, शाळेतील प्रत्येक वर्गात जुन्या पुस्तकांचे असे संच तयार करून वर्गातच ठेवले जातात. ज्या जो संच आवडेल तो घेता येतो.

मारेगावात बारकोड, तर गणेरीत टॅब
दारव्हा तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यांतील काही शाळांनीही दप्तरमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत. मारेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संदीप कोल्हे यांनी पाठ्यपुस्तकावरील बारकोडच्या झेरॉक्स प्रती काढून विद्यार्थ्यांच्या पालकांना दिल्या. पालक आपल्या स्मार्टफोनमध्ये हे बारकोड स्कॅन करून संपूर्ण पुस्तक मोबाईलवरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. तर घाटंजी तालुक्यातील गणेरीच्या जिल्हा परिषद शाळेत संदीप मोवाडे या शिक्षकाच्या पुढाकाराने प्रत्येक वर्गासाठी एक टॅब उपलब्ध करून घेतला असून त्यावरच संपूर्ण पाठ्यपुस्तके लोड करून ठेवली. त्यामुळे मुलांना कमी पुस्तके शाळेत आणावी लागतात.

तालुक्यातील ७० टक्के शाळा आम्ही कव्हर केल्या आहेत. आता १०० टक्के शाळा दप्तरमुक्त करण्यात येईल, असा विश्वास आहे.
- प्रमोद सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी, दारव्हा

Web Title: 52 schools became free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.